X

Kerala Floods : १४ व्या दिवशी नौदलाने ‘ऑपरेशन मदत’ थांबविले

अनेक दिवसांपासून बंद असलेलं कोची विमानतळ देखील २९ ऑगस्टपासून पूर्ववत

केरळमध्ये पूरग्रस्त नागरिकांच्या बचावासाठी नौदलाकडून सुरू करण्यात आलेलं ‘ऑपरेशन मदत’ थांबवण्यात आलं आहे. मुसळधार पावसाच्या थैमानामुळे पूर परिस्थितीतून नागरिकांचा बचाव करण्यासाठी नऊ ऑगस्टपासून नौदलाच्यावतीने ऑपरेशन मदत सुरू करण्यात आले होते. पण पावसाचा जोर कमी झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणांतील पाणी ओसरलं असल्यामुळे नागरिकांकडून मदतीसाठीची मागणी येत नसल्याचे सांगत नौदलाने ऑपरेशन मदत बंद करत असल्याची माहिती दिली.

‘ऑपरेशन मदत’च्या माध्यमातून 16 हजार ५ जणांना वाचवण्यात यश आलं. ‘ऑपरेशन मदत’ जरी थांबवलं असलं तरीही पूरग्रस्त लोकांना जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. विमानातून पूरग्रस्तांना अन्न आणि औषधे पुरविली जात आहेत. अशी माहिती नौदलाच्या दक्षिण विभागाने दिली.

पाणी ओसरायला सुरूवात झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेलं कोची विमानतळ देखील पूर्ववत होणार आहे. २९ ऑगस्टपासून येथून उड्डाणं सुरू होतील अशी माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी २६ ऑगस्टपासून विमानतळ सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. केरळमध्ये पुरानंतर हजारो कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.

मदत नाकारली –

केरळमध्ये आलेल्या पुरानंतर चहुबाजूंनी मदतीचा ओघ सुरू आहे. अनेक देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. युएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी केरळला ७०० कोटी रुपयांची मदत देऊ केली होती. मात्र, मदत करू इच्छिणाऱ्या या देशांचे आभार मानत भारताने त्यांची मदत नम्रपणे नाकारली आहे.