डॉल्फिन मासेही एकमेकांना नावाने हाक मारतात अगदी माणसासारखे.. असे नव्या अभ्यासात दिसून आले आहे. डॉल्फिन मासे हा एक जलचर सस्तन प्राणी आहे. ते जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा एक विशिष्ट असा शिटीसारखा आवाज काढतात, त्यावरून ते एकमेकांना ओळखतात. जेव्हा त्यांचीच हाक त्यांना प्रतिध्वनित होऊन परत येते तेव्हा ते त्याला प्रतिसाद देतात. डॉल्फिन माशांमधील हे संदेशवहन अशी त्रिमिती पर्यावरणात घडत असते, असे स्कॉटलंड येथील सेंट अँड्रय़ूज विद्यापीठाचे डॉ. व्हिन्सेंट जॅनिक यांनी म्हटले आहे. हे डॉल्फिन मासे अशा पर्यावरणात राहतात जिथे ते एकमेकांशी अतिशय प्रभावी पद्धतीने संपर्क करू शकतात. वैज्ञानिकांना फार पूर्वीपासून असे वाटत होते, की डॉल्फिन मासे वेगवेगळय़ा प्रकारच्या शिटय़ा वाजवतात व त्यात ते एकमेकांना माणूस ज्याप्रमाणे नावाने हाका मारतो तसेच एकमेकांना नावाने साद घालत असतात. ते एकमेकांना नावानेच हाक मारतात यावर शिक्कामोर्तब करणारे संशोधन प्रथमच झाले आहे. वैज्ञानिकांनी डॉल्फिनच्या वाइल्ड बॉटलस्टोन डॉल्फिन या प्रजातीच्या शिटीसारख्या आवाजाचा नमुना गोळा केला. नंतर त्यांनी हाच ध्वनी पाण्याखाली ध्वनिवर्धक लावून प्रक्षेपित केला तेव्हा त्याला विशिष्ट डॉल्फिन माशानेच शिटीसारखा आवाज काढून प्रतिसाद दिला.
डॉल्फिन मासे हे माणसासारखेच वागतात, जेव्हा त्यांना त्यांचे नाव या शिटीच्या माध्यमातून ऐकू येते तेव्हा ते त्याला प्रतिसाद देतात, उत्तर देतात असे संशोधकांचे म्हणणे आहे. जॅनिक यांनी सांगितले, की हे कौशल्य त्यांच्यात येण्याचे कारण म्हणजे सागराखालील खूप मोठय़ा पर्यावरणात त्यांना समूहाने राहावे लागते. अनेकदा ते एकमेकांना पाहू शकत नाहीत. पाण्यात वास घेऊ शकत नाहीत. ते एका ठिकाणी येऊन विसावू शकत नाहीत. त्यांना घरटी नसतात जिथे ते परत येतील. प्राण्यांच्या विविध समूहांमध्ये एकाचवेळी ही कौशल्ये कशी विकसित झाली याचा उलगडा झाला तर मानवातही संज्ञापन कला कशी विकसित झाली यावर नवा प्रकाश पडू शकेल.

बुद्धिमान डॉल्फिन
डॉल्फिन मासे हे तुमच्या-आमच्यासारखे सस्तन प्राणी आहेत. त्यांना दात असतात, ते उष्ण रक्ताचे आहेत. त्यांच्या हृदयाला चार कप्पे असतात. डॉल्फिनच्या अंगावर थोडे केसही असतात. डॉल्फिन हे कुत्री, मांजरे व इतर सस्तन प्राणी यांच्याप्रमाणे दृष्टी, स्पर्श, चव, ध्वनी यांच्या मदतीने एकमेकांशी संपर्कात असतात. त्यांना वास घेण्याची क्षमता नसते. ते विशिष्ट प्रकारचा शिटीसारखा आवाज काढतात, त्यामुळे दुसरा डॉल्फिन जवळपास असल्याचे त्यांना कळते. वैज्ञानिकांच्या मते डॉल्फिन हे कुत्री किंवा चिम्पांझी यांच्याइतकेच बुद्धिमान असतात. त्यांना एखादी कृती करण्यास शिकवता येते. कुठलीही कृती त्यांना टप्प्याटप्प्याने सांगितली तर ते ती शिकतात.