27 November 2020

News Flash

काय??… चीन नाही तर या देशात मागील वर्षी सप्टेंबरमध्येच आढळला होता करोना विषाणू

संशोधकांनी हा दावा केला असून जागतिक आरोग्य संघटनाही करणार अभ्यास

प्रातिनिधिक फोटो

करोनाची उत्पत्ती चीनमधील वुहानमध्ये झाल्याचे सांगितले जात असले तरी करोनाचा विषाणू इटलीमध्ये मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आढळून आल्याचा दावा आता संशोधकांनी केला आहे. मिलान शहरामधील नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूटच्या संशोधकांनी हा दावा केला असून करोनाचा फैलाव मागील वर्षी नोव्हेंबरआधीपासूनच सुरु झाल्याचेही सांगण्यात आलं आहे. त्यामुळेच चीनमधील वुहानमधून करोनाचा प्रादुर्भाव जगभरात झाल्याचा दावा चुकीचा आहे का यासंदर्भातील चर्चा आता सुरु झाल्या असून या संशोधनाचा अभ्यास आता जागतिक आरोग्य संघटनाही करणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) करोना हा श्वसनाशी संबंधित आजार असून याची साथ येण्याआधी यासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नव्हती असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे या विषाणूची उत्पत्ती मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्य चीनमधील वुहान प्रांतामध्ये झाल्याचेही डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे. मात्र त्याचवेळी डब्ल्यूएचओने ‘हा विषाणू या पूर्वीही इतर भागांमध्ये पसरला असल्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असंही म्हटलं होतं. इटलीमधील संशोधकांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास डब्ल्यूएचओकडून केला जात असल्याचेही संस्थेने स्पष्ट केलं आहे. मागील आठवड्यामध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला असून यासंदर्भातील माहिती आम्ही मागवल्याचे डब्ल्यूएचओने सोमवारी स्पष्ट केल्याचं रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

इटलीमध्ये करोनाचा पहिला रुग्ण २१ फेब्रुवारी रोजी लोम्बार्डी प्रांतामधील मिलानजवळच्या छोट्या शहरामध्ये आढळला होता. तुमोरी जर्नलमध्ये इटालियन संशोधकांनी केलेल्या अभ्यासाचा अहवाल छापून आला आहे. या अभ्यासामध्ये ९५९ स्वयंसेवक सहभागी झेल होते. या तरुणांच्या फुफुसांचे स्कॅनिंग करुन त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे की नाही हे तपासण्यात आलं. या चाचण्या सप्टेंबर २०१९ ते मार्च २०२० दरम्यान पार पडल्या. यापैकी ११.६ टक्के तरुणांच्या शरिरामध्ये इटलीत करोनाचा पहिला रुग्ण आढळण्याआधीच म्हणजेच फेब्रुवारीआधीच करोनाविरुद्ध लढा देणाऱ्या अ‍ॅण्टीबॉ़डीज निर्माण झाल्याचे आढळून आलं.

यानंतर सार्स कोव्ही-टू या विषाणूसाठीच्या अ‍ॅण्टीबॉडीजची चाचणी सिएना विद्यापिठामध्ये करण्यात आली. ‘इटलीमध्ये साथपूर्वी कालावधीमध्ये अनपेक्षितपणे सार्स कोव्ही-टू अ‍ॅण्टीबॉडीज सापडण्यासंदर्भात,’ अशा मथळ्याखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मागील वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही स्वयंसेवकांच्या शरीरामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज आढळून आल्या. म्हणजेच या चार जणांना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये करोनाचा संसर्ग झाला होता असं या अहवालाचे लेखक असणाऱ्या जिओव्हानी ओप्लोवन यांनी रॉयटर्सशी बोलताना म्हटलं आहे. “या संशोधनाचा अर्थ असा होतो की करोनाचा मोठ्याप्रमाणात फैलाव होण्याआधी हा विषाणू अस्तित्वात होता. तो कमी घातक होता,” असं जिओव्हानी म्हणाले.

हा अहवाल सादर करणारे लेख, संशोधक यांच्याशी संपर्क करुन या अभ्यासासंदर्भातील सर्व माहिती घेतली जाणार असून संशोधनाची पद्धत, नमुने या सर्वांचाही पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल असं डब्ल्यूएचओ म्हटलं आहे. लोम्बार्डी प्रांतामध्ये अचानक मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात फ्लूचे रुग्ण आढळून आले होते. त्याचवेळी करोनाचा विषाणू यापूर्वीपासून अस्तित्वात असू शकतो असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 10:57 am

Web Title: researchers find coronavirus was circulating in italy earlier than thought scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : देशभरात २४ तासांत ४८ हजार ४९३ जण करोनामुक्त
2 निवडणुकीपूर्वी बाहेरील गुंड आणून शांतता भंग करण्याचा प्रयत्न; ममता बँनर्जींचा भाजपावर आरोप
3 जम्मू-काश्मीर : टोल नाक्यावरील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X