करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जण या आजाराचा बळी ठरत आहेत. या आजाराच्या संदर्भात दररोज नवनवीन संशोधन समोर येत आहे. एका संशोधनातून आता असं समोर आलं आहे की आता कुत्रेही करोना रुग्णांना ओळखू शकतात. त्यांना तशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

लंडन स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनच्या संशोधकांच्या अभ्यासानुसार, कुत्र्यांना गर्दीच्या ठिकाणी किंवा विमानतळांवर नेऊन आपण त्या परिसरातले करोना रुग्ण शोधून काढू शकतो.

याबद्दल रियुटर्सने दिलेल्या बातमीनुसार, या कुत्र्यांचे दोन गट करण्यात आले. एका गटाला करोना रुग्ण ओळखण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यांना अर्ध्या तासासाठी विमानातून बाहेर पडणाऱ्या काही लोकांच्या आसपास नेण्यात आलं. या कुत्र्यांचं निदान ९४.३ टक्क्यांपर्यंत बरोबर होतं.

या अभ्यासासाठी नागरिकांनी तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांनी घातलेले, न धुतलेले कपडे, मोजे यांचा वापर करण्यात आला. अभ्यासकांनी सांगितलं की, या कुत्र्यांनी लक्षणं नसलेल्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या बाधितांनाही बरोबर ओळखलं. सहा प्रशिक्षित कुत्र्यांसोबत हा अभ्यास करण्यात आला.

पूर्वी काही संशोधनातून हे लक्षात आलं होतं की कुत्रे कॅन्सर, मलेरिया सारख्या आजारांचं निदान करु शकतात. अगदी सौम्य वासही त्यांना चटकन लक्षात येतो.