व्याजदराबाबत उत्सुकता

इंधनदरवाढ आणि रुपयाच्या मूल्यातील चढउताराच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी जाहीर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कर्जाच्या व्याजदरांबाबतही उत्सुकता आहे. शुक्रवारी होणारी रिझव्‍‌र्ह बँकेची पतधोरण बैठक, रुपयाची मूल्यघसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतीतील वाढ यांच्यावरच येत्या आठवडय़ातील शेअर बाजाराती स्थिती अवलंबून असेल असे तज्ज्ञांनी सांगितले.

बाजारात सध्या अस्थिरता आहे. त्याला स्थैर्य मिळेपर्यंत आणि गमावलेला विश्वास पुन्हा प्रस्थापित होईपर्यंत बाजारात मंदीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेची संभाव्य पतधोरण बैठक बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाची असेल, असे जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनाद नायर यांनी सांगितले. व्याजदराबाबतच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष आहे, असे एपिक रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुस्तफा नदीम म्हणाले. बँकेने व्याजदर ०.२५ टक्क्य़ाने वाढवले तर बाजारात प्रतिक्रिया उमटेल, असा अंदाज सॅमको सिक्युरिटीज अ‍ॅण्ड स्टॉकनोटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिमीत मोदी यांनी व्यक्त केला.