चालू वर्षातील पहिल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा दिलेला नाही. रेपो रेट सहा टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के असा कायम ठेवण्यात आला आहे.

चालू आर्थिक वर्षातील पतधोरणाअंतर्गत व्याजदर बदलाबाबतची रिझर्व्ह बँकेची दोन दिवसांची बैठक गुरुवारी संपली. या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ६ टक्के, रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के इतका कायम ठेवला आहे.

यापूर्वी देखील सलग तीन पतधोरणात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते. रेपो दरात शेवटची पाव टक्क्यांची कपात ऑगस्ट २०१७ मध्ये झाली होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात करण्याची मागणी केली जात होती. मात्र, रेपो दर कायम ठेवण्यात आल्याने सर्वसामान्यांचा हिरमोड झाला आहे. रेपो रेट कायम ठेवण्यात आल्याने व्याजदरात दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

रेपो व रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय ?
देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचं कर्ज घेतं त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. तर ज्यावेळी बँका आपल्याकडचा अधिक असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.