जम्मू काश्मीरच्या राज्य मंत्रिमंडळात सोमवारी फेरबदल करण्यात आले असून भाजपच्या काविंदर गुप्ता यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाचा शपथविधी कन्वेन्शन सेंटर येथे पार पडला. गुप्ता यांच्यासह भाजपच्या सत शर्मा, डी. के. मन्याल, सुनील शर्मा या मंत्र्यांनीही जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन. एन. वोहरा यांच्या उपस्थितीत पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात राजीव जसरोटिया आणि शक्ती परिहार यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली. या बरोबरच मोहम्मद अश्रफ मीर आणि मोहम्मद खलील बंद या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) मंत्र्यांनाही कॅबिनेट मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे.

रविवारी संध्याकाळी निर्मल सिंग यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळीच या पदावर नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिलेल्या अहवालात भाजप-पीडीपी मंत्रिमंडळात असलेले भाजपचे सर्व मंत्री हे पीडीपीच्या प्रभावाखाली कार्यरत असल्याचे नमूद केले होते.

तसेच, कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी संशयितांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत भाजपचे दोन मंत्री सामील झाले होते. त्यामुळे भाजपची नाचक्की झाली असून त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्‍यामुळे जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांवर सर्वच स्तरातून टीका झाली होती. या दोन प्रमुख कारणांमुळे भाजपने राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्‍यामुळे रॅलीत सहभागी झालेल्‍या दोन मंत्र्यांनी आणि त्यानंतर उर्वरित ९ अशा राज्य मंत्रिमंडळातील भाजपच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्‍यानंतर रविवारी रात्री उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनीही आपल्‍या पदाचा राजीनामा दिला.