आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेले आश्वासन अखेर पूर्ण केले. पक्षाने १ जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी घरटी रोज ६६७ लिटर मोफत पाणी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ज्यांच्या घरात पाण्याचे मीटर्स सुरू आहेत, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तीन महिन्यांनंतर या योजनेचा आढावा घेतला जाईल. सत्तेत आल्यास रोज सातशे लिटर मोफत पाणी देण्याचे आश्वासन आम आदमी पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी दिल्ली जल मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुमार यांनी याबाबतची घोषणा केली. यापेक्षा पाण्याचा वापर झाल्यास दर आकारला जाईल, असे कुमार यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र ताप असल्याने सोमवारी ते कार्यालयात आले नाहीत. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्यांनी आपल्या निवासस्थानीच अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
गेल्याच महिन्यात दिल्ली जल मंडळाने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जानेवारीपासून पाण्याच्या दरांमध्ये १० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तसेच दिल्लीतील बेकायदा सोळाशे वसाहतींमध्ये पाण्यासाठी सरकार दर लावणार काय हे स्पष्ट झालेले नाही. या घरांमध्ये अजून पाण्याचे मीटर बसवलेले नाहीत.
सोमवारी कार्यालयात जाणे महत्त्वाचे होते. पाण्याबाबतच्या योजनेची घोषणा होती. मात्र देवाने चुकीच्या वेळी आजारी पाडले, अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी ट्विटरवर दिली आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून, तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. केजरीवाल यांची सोमवारी कार्यालयात जाण्याची इच्छा होती, मात्र आपणच त्यांना मनाई केली, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर बिपिन मित्तल यांनी सांगितले.