मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार व लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या झकीउर रेहमान लख्वी याला जामीन देणाऱ्या पाकिस्तानची भारतीय संसदेत सर्वपक्षीय सदस्यांनी निंदा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लख्वीला जामीन देण्याची घटना म्हणजे मानवतेवर विश्वास ठेवण्याऱ्या सर्वाना मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया देत पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघडकीस आणला. अवघ्या दोनच दिवसांपूर्वी पेशावरमधील शालेय विद्यार्थ्यांवर दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचा निषेध भारताने केला होता, याची आठवण मोदी यांनी पाकिस्तानला करून दिली. सबळ पुरावा नसल्याचे सोंग पुढे करून लख्वीला जामीन देणाऱ्या पाकिस्तानचा कठोर शब्दात संसदेत निषेध करण्यात आला.
पेशावरमधील सैनिकी शाळेवर हल्ला करून पाकिस्ताननेच पोसलेल्या तालिबानी दहशतवाद्यांनी अवघ्या मानवतेला आव्हान दिले. भारतानेदेखील सर्व मतभेद दूर करून पाकिस्तानच्या या दु:खात सहभागी होऊन सर्वतोपरी साह्य़ करण्याची तयारी दर्शवली होती. पाकिस्तानने मात्र एकीकडे दहशतवादाविरोधात लढा देण्याचे सोंग पांघरून लख्वीला जामीन दिला. त्यामुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानचे खरे स्वरूप पुन्हा एकदा उघड झाले आहे, असे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले की, पेशावरमधील घटनेची पाकिस्तानला जितकी वेदना झाली, त्यापेक्षा यत्किंचतही कमी वेदना भारताला झाली नाही. त्या दिवशी प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू होते. पण  त्यानंतर लगेचच (लख्वीला जामीन देण्याचा) हा प्रकार पाहून आम्हाला मोठा धक्का बसला आहे. लख्वीला जामीन देणे मानवतेवर आघात आहे. पाकिस्तानला योग्य शब्दात संदेश देण्यात आला आहे. यापुढेही भारताची हीच (कठोर) भूमिका कायम राहील.
पाकिस्तानची भूमिका हास्यास्पद
पंतप्रधानांच्या निवेदनानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, लख्वीला जामीन दिल्याने दहशतवादाविरोधात लढा देण्याची पाकिस्तानची भूमिका किती हास्यास्पद आहे, हेच स्पष्ट झाले.
लख्वीला जामीन दिल्याने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानी विदेशमंत्र्यांची भेट घेऊन अत्यंत कठोर शब्दांत भारताची भूमिका मांडली आहे. यूएनएससीने कुख्यात ठरवलेला दहशतवादी लख्वीला जामीन देणे भारताला कदापि मान्य होणार नाही. दहशतवाद्यांशी पाकचे लागेबांधे ?
वॉशिंग्टन : पेशावरच्या लष्करी शाळेवरील दहशतवादी हल्ल्यामुळे लष्कर-ए-तय्यबासारख्या दहशतवादी संघटनांशी पाकिस्तानच्या असलेल्या धोरणात्मक संबंधांमध्ये काहीही बदल होणार नाही, असे अमेरिकेतील दक्षिण आशियाविषयक विषयांच्या एका तज्ज्ञाने म्हटले आहे.
शाळेवरील हल्ला कितीही भयानक असला, तरी त्यामुळे पाकिस्तानने काही दहशतवादी गटांशी राखलेल्या संबंधांच्या मूल्याबाबत पाकिस्तानच्या लष्करी डावपेचाबद्दलचे हिशेब बदलतीलच, असे म्हणता येत नसल्याचे कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स (सीएफआर) या संस्थेतील भारत, पाकिस्तान व दक्षिण आशियाचे सीनियर फेलो डॅनियल मार्की यांनी म्हटले आहे. लष्कर-ए-तय्यबाकिंवा तिच्यासारखीच उद्दिष्टे व महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या, पण वेगळ्या नावाने काम करणाऱ्या इतर संघटनांशी अजूनही कायम असलेल्या संबंधांबाबत भारताला चिंता वाटणे साहजिकच आहे. पाकिस्तानचे सैन्य  तालिबानशी लढत असतानाही लष्करचा संस्थापक हाफीझ मोहम्मद हा पाकिस्तानमध्ये खुलेपणाने फिरतो आहे, याकडे मार्की यांनी लक्ष वेधले.
दहशतवाद्यांची रोख मदत
लंडन : इराक व सीरियामधील जमिनीचे पट्टे बळकावणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटात सहभागी होऊन त्यांच्यासोबत लढण्यासाठी इस्लामिक स्टेटशी संबंध असणारे ब्रिटनमधील दहशतवादी तेथील किशोरवयीन मुलांना रोख रक्कम देत आहेत.
‘दी टाइम्स’ नियतकालिकाने त्यांच्या दोन वार्ताहरांना शालेय विद्यार्थिनी असल्याचे भासवून तीन महिने गुप्त मोहीम राबवली. यात त्यांना १७ वर्षे  वयाच्या ब्रिटिश मुसलमानांना विदेशात लढण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व भरती करणारा एक सेल कार्यरत असल्याचा पुरावा मिळाला, असे या संदर्भात सांगण्यात आले.