गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये भिजत पडलेला प्रश्न आहे तो काश्मीर प्रश्न. या प्रश्नावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अशात काश्मीरप्रश्नी पाकिस्तानने भारताशी चर्चा केली पाहिजे, अशी भूमिका मांडत चीनने पाकिस्तानचे कान टोचले आहेत. काश्मीरप्रश्नाची दखल संयुक्त राष्ट्राने घ्यावी या इस्लामी सहकार्य संघटनेची (ओआयसी) मागणीही चीनने फेटाळली आहे.

काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्राचा ठराव लागू करण्यात यावा यासाठी ‘ओआयसी’ आग्रही आहे. पाकिस्तान हा या संघटनेचा देश आहे. हा ठराव मंजूर व्हावा अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी केली. मात्र काश्मीरबाबत चीनचे धोरण स्पष्ट केले. चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ या योजनेला भारताने विरोध दर्शवला आहे तो मागे घेतला जावा म्हणून चीनने अशी भूमिका घेतल्याची चर्चा आता रंगते आहे.

खरेतर काश्मीर मुद्द्यावर चीनने ५० च्या दशकापासून वेगवेगळी भूमिका घेतली. काश्मीरचा तिढा हा द्विपक्षीय मुद्दा आहे, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी चर्चा करून तो सोडवावा असे चीनने ९० च्या दशकातही म्हटले होते. मात्र भारताने अाण्विक चाचणी केल्यावर चीनची डोकेदुखी वाढली. ज्यानंतर भारतावर दबाव आणण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनने कारवाया सुरू केल्या. मागील वर्षी चीन आणि पाकिस्तानचे सैनिक पाकव्याप्त काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसले होते.

जून २०१७ मध्ये डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन या दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले. आता डोकलामचा प्रश्न सुटला आहे. तर ‘वन बेल्ट वन रोड’ ही चीनची महत्त्वांकाक्षी योजना आहे. मात्र या योजनेचा एक भाग पाकव्याप्त काश्मीरशी जोडलेला आहे, म्हणूनच भारताने या योजनेला विरोध केला आहे. आता भारताचा विरोध मावळावा यासाठी पाकिस्तानला चीनने सुनावले आहे असेच दिसते आहे.