देशातील असहिष्णुतेच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शांतता, ऐक्य आणि सलोख्याचे आवाहन केले. जनतेने एकमेकांच्या परंपरांचा आणि मतांचा आदर केला पाहिजे, त्याचा अभाव राहिल्यास त्यामुळे विकासाच्या वाटेत अडथळे येऊ शकतात, असे मोदी म्हणाले.

आपला देश विविधतेने नटलेला आहे आणि तीच आपली मोठी शक्ती आहे, सलोखाच आपली शक्ती आहे, असे मोदी यांनी येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रीय युवक महोत्सवाला संबोधित करताना स्पष्ट केले.

आपले सरकार देशाच्या विकासासाठी कार्य करीत आहे. आपण सलोखा राखला नाही तर आपण प्रगती करू शकणार नाही. ऐक्य आणि सलोखा नसेल, एकमेकांच्या परंपरांचा आपण आदर केला नाही तर विकासाच्या मार्गात अडथळे येऊ शकतात, असे ते म्हणाले.

शांतता, ऐक्य आणि सलोखाच नसेल तर भरभराट, संपत्ती आणि रोजगारनिर्मितीला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे शांतता, ऐक्य आणि सलोखा ही काळाची गरज आहे आणि याच बाबी देशाच्या प्रगतीच्या हमी आहेत, असेही ते म्हणाले.