‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; देशवासीयांचे आभार

देशातील जनतेने अयोध्या प्रकरणी निकालानंतर संयम, सहनशीलता व परिपक्वता या तीन गोष्टींचे दर्शन घडवत  देशहितापेक्षा काहीच मोठे असू शकत नाही याची प्रचिती दिली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले.

या ऐतिहासिक निकालानंतर देशाने एको नवीन मार्गावर वाटचाल सुरू केल्याचे सांगून ते म्हणाले, की आता नवीन आशा आकांक्षा घेऊन नवीन भारत शांतता, एकता, सदिच्छा यांच्या बळावर मार्गक्रमण करील.

मोदी यांनी दिवाळीच्या वेळी ‘मन की बात’ कार्यक्रमात अयोध्या प्रकरणी निकालानंतर लोकांनी संयम पाळण्याचे आवाहन केले होते. २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही सरकार, नागरी समुदाय व लोक यांनी शांतता व  सुसंवादाचा अंगीकार केला होता असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात असे सांगितले, की या वेळीही ९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता त्यावर लोकांनी देशहित सर्वोच्च स्थानी ठेवून शांतता पाळली, संयम दाखवला. आपल्या देशासाठी शांतता, एकता व सदिच्छा हीच मूल्ये सर्वोच्च आहेत. निकालाचा देशातील लोकांनी खुल्या दिलाने स्वीकार केला. त्यांनी जो संयम व परिपक्वता दाखवली त्यासाठी त्यांचे आपण आभारी आहोत. हा निकाल देशाच्या न्यायिक इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा आहे.  या निकालाने बराच काळ  रेंगाळलेली न्यायालयीन लढाई संपली, तर दुसरीकडे न्यायव्यवस्थेबाबत लोकांचा आदर वाढला आहे, असे मोदी म्हणाले.

कोणतीही शक्ती राममंदिराची उभारणी रोखू शकत नाही – राजनाथ सिंह</strong>

जगातील कोणतीही शक्ती आता अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यात आडवी येऊ शकत नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी येथील प्रचारसभेत सांगितले. विश्रामपूर विधानसभा मतदार संघात त्यांनी सांगितले की, राफेल जेट लढाऊ विमाने देशाने फ्रान्सकडून घेतली आहेत, ती सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या छावण्यांवर हल्ले करण्यास सक्षम आहेत.

‘जय श्रीराम’चा गजर या वेळी उपस्थितांनी केला. राजनाथ सिंह म्हणाले की, मंदिर उभारणीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रशस्त झाला आहे.

फेरविचार याचिका केल्यास हिंदू-मुस्लीम ऐक्याची हानी: रिझवी

नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणात दिलेल्या निकालाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करणे हे मुसलमानांच्या हिताचे असणार नाही आणि त्यामुळे हिंदू व मुस्लीम या दोन समुदायांमधील ऐक्याची हानी होईल, असे मत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष गैयूरुल हसन रिझवी यांनी रविवारी व्यक्त केले. फेरविचार याचिका दाखल केल्यास, मुसलमान अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामात अडथळे आणत असल्याचा संदेश जाईल, असे रिझवी म्हणाले. मशिदीसाठी देण्यात आलेली ५ एकरची पर्यायी जमीन स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी मुस्लीम पक्षकारांना केले. यामुळे न्यायालयाच्या निकालाचा आदर केल्यासारखे होईल, असे ते म्हणाले.