कलम ३७० रद्द करण्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये संचारबंदीसह अनेक निर्बंध घालण्यात आले होते. आता हळूहळू निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात असून जम्मूतून संचारबंदीसह सर्व निर्बंध बुधवारी हटवण्यात आले आहेत. मात्र, काश्मीरमध्ये कायम ठेवण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० केंद्र सरकारने रद्द केले आहे. या निर्णयावरून काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उफाळण्याची शक्यता असल्याने संचारबंदीसह दूरसंचार सेवा आणि वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले होते. परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध काढून घेण्यात येत आहे. त्याची सुरूवात जम्मूतून करण्यात आली आहे. याविषयी जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुनीर खान म्हणाले, जम्मूमधून पूर्णपणे निर्बंध हटवण्यात आले आहे. पण काश्मीरमधील काही भागात कायम ठेवण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात संचारबंदीसह दूरसंचार, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. याचा परिणाम स्थानिकांच्या जीवनावर झाला आहे. दूरसंचार सेवा बंद असल्याने नागरिकांना प्रशासनाने सुरू केलेल्या फोन सेवेसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. काश्मीर खोऱ्यातील हे निर्बंध उठवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने प्रशासनाच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असून, परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाला वेळ दिला आहे.