देशभर वधारलेला कांद्याचा भाव उतरणीला लागावा यासाठी केंद्र सरकारने कांदा आयातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. आयात कांद्यामध्ये कीड नसल्याची खात्री करून घेण्यासाठी फायटोसॅनिटरी व फ्युमिगेशन प्रमाणपत्र सक्तीचे असते. पण त्यात सवलत देण्यात आली असून फ्युमिगेशन भारतात केले जाणार आहे.

कांद्याच्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी आयात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीटद्वारे दिली. कांद्याच्या निर्यातीवर याआधीच बंदी घालण्यात आली आहे. शिवाय कांद्याचा तुटवडा होऊ  नये यासाठी बफर साठाही केला जात आहे. आयात निर्बंधांमध्ये सवलत दिल्यामुळे परदेशातून आलेला कांदा देशी बाजारांत पुरेसा प्रमाणात उपलब्ध होऊ  शकेल, असे गोयल यांचे म्हणणे आहे.

१८ ऑक्टोबरनंतर कांद्याचे भाव अचनाक कडाडले. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांहून अधिक भाववाढ झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या तीनही राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले. केंद्र सरकारकडे रब्बीतील कांद्याचा बफर साठा असून तो बाजारात आणला जाईल. त्यामुळे कांद्याचे दर उतरतील. तसेच आवश्यकतेनुसार कांदा आयात केला जात असून त्यावरील निर्बंध शिथिल केले गेले आहेत, असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.