अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी राज्यातील महाविकास आघाडी सरकार व काँग्रेसला लक्ष्य केले. प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य काँग्रेसला नेहमीच खटकते. विरोधकांचा आवाज दबून टाकला जातो. काँग्रेसच्या आशीर्वादाने चालणारे महाराष्ट्रातील सरकार बोलण्यावर निर्बंध आणत आहे. राज्यचालवण्याशिवाय हे सरकार सर्व काही करत आहे, अशा शाब्दिक प्रहार नड्डा यांनी केला.
विरोधी आवाज बंद करण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, आणीबाणीत त्याचा अनुभव घेतला आहे. या पक्षाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचा अधिकार नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळातही प्रसारमाध्यमांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला गेला. हाच प्रकार महाराष्ट्रात होत असून त्याची हे राज्य प्रयोगशाळा बनली आहे. महाराष्ट्रात विरोधकांना त्रास दिला जातो, त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातो, अशी टीका नड्डा यांनी केली.
काँग्रेसने पंतप्रधान मोदींबाबत कधीही आदर व्यक्त केला नाही, असाही आरोप नड्डा यांनी केला. गरीब कुटुंबात जन्माला येऊन पंतप्रधान होण्यापर्यंत ज्या व्यक्तीने आपले कर्तृत्व सिद्ध केले तिच्याबद्दल काँग्रेस घराण्याने नेहमीच द्वेष दाखवला. पण, लोकांनी मोदींवर अमाप प्रेम केले. मोदींबाबत काँग्रेस जेवढा खोटा बोलेल आणि द्वेष करेव तेवढे जास्त लोक मोदींच्या पाठीशी उभे राहतील, असे ट्विट नड्डा यांनी केले.
पंजाबमध्ये शेती कायद्याच्या विरोधातील निदर्शनादरम्यान मोदींचा पुतळा जाळण्यात आला. त्याचा संदर्भ देत नड्डा यांनी काँग्रेसला फटकारले. पंजाबमधील या घटनेला पक्षाचे नेते राहुल गांधी जबाबदार आहेत. मुलगा ( राहुल गांधी) क्रोध, द्वेष पसरवत आहे तर, माता (सोनिया गांधी) लोकशाहीवर पोकळ सल्ले देत आहे, अशी टिप्पणीही नड्डा यांनी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 12:44 am