नवी दिल्ली: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राखीव ठेवला. उमेदवारी अर्जात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणवीस यांनी फेरविचार याचिका केली.

या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याची गरज नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गेल्या ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल केला होता. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. फडणवीस यांच्या फेरविचार याचिकेवर न्या. अरुण मिश्रा, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या पीठापुढे सुनावणी झाली. लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांने केला होता.

लोकप्रतिनिधी कायद्याच्या ३३ अ (१) नुसार फौजदारी गुन्ह्यामध्ये आरोपनिश्चित झाले नसतील तर त्याची माहिती देण्याचे कोणतेही बंधन नाही. गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतली म्हणून त्याची माहिती द्यावी असे नव्हे, असा प्रतिवाद फडवणीस यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुंद रोहतगी यांनी केला.