ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ होऊन तो ४.६२ टक्क्यांवर पोहचला आहे. सरकाकरडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दर ३.९९ टक्के होता.

तर मागीलवर्षी ऑक्टोबर महिन्यातील किरकोळ महागाई दर ३.३८ टक्के होता. ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थांमधील महागाई ७.८९ टक्के होती तर, सप्टेंबर महिन्यात हा आकडा ५.११ टक्के होता.

रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दर हा ४ टक्क्यांच्या आसपास राखण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र ज्याप्रकारे खाद्यपदार्थांच्या किंमती वाढत आहेत, त्यामुळे किरकोळ महागाई दराने आरबीआयची सीमा ओलांडली असल्याचे दिसत आहे. मागील काही महिन्यात खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या वर्षी मे महिन्यातील महागाईचा दर १.८३ टक्के होता, जो की वाढून ऑक्टोबर महिन्यात ७.८९ टक्क्यांवर पोहचला.