औद्योगिक उत्पादनातही घसरण

नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्था गाठण्याचे सरकारचे लक्ष्य असले, तरी त्यास पोषक आर्थिक वातावरण लाभत नसल्याचे वाढत्या महागाई दराने स्पष्ट केले आहे. जूनमध्ये किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ३ टक्क्यांपुढे सरकत ३.१८ पर्यंत उंचावला. ही गेल्या आठ महिन्यांतील सर्वाधिक वाढ आहे.

प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमती वाढल्याने यंदाचा महागाई दर हा मेमधील ३.०५ टक्क्यांपुढे गेला आहे. वर्षभरापूर्वी, जून २०१८ मध्ये तो ४.९२ टक्के होता. खनिकर्म, निर्मिती क्षेत्राने मेमधील एकूण औद्योगिक उत्पादन खुंटविले असतानाच खाद्यान्नाच्या वाढत्या किमतीने महागाईत इंधन टाकले आहे. किरकोळ महागाई दर २०१९ च्या सुरुवातीपासून, जानेवारीपासून सातत्याने वाढत आहेत.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार, एकूण किरकोळ महागाईत महत्त्वाचा ठरणारा अन्नधान्याच्या किमतीचा दर यंदाच्या मेमधील १.८३ टक्क्यांवरून जून २०१९ मध्ये २.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे. आधीच्या महिन्याच्या तुलनेत यंदा अंडी, मटण, मांस यांच्याही किमती वाढल्या आहेत.

त्याचबरोबर औद्योगिक उत्पादन दरही यंदा खुंटला आहे. वर्षभरापूर्वी, मे २०१८ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ३.८ टक्के होता, तर गेल्या वित्त वर्षांच्या अखेरीस, मार्च २०१९ मध्ये तो ०.४ टक्के नोंदला गेला. यंदाच्या मेमध्ये खनिकर्म क्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वीच्या ५.८ टक्क्यांवरून थेट ३.२ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे, तर निर्मिती क्षेत्र ३.६ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांवर स्थिरावले.

दोन महिन्यांपूर्वी ऊर्जानिर्मिती (७.४%), प्राथमिक वस्तू (२.५%) उद्योगाने वाढ नोंदविली, तर भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात वेगाबाबत नकारात्मकता नोंदली गेली आहे. मार्च २०१९ अखेर देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग ५.८ टक्के असा पाच वर्षांतील तळात राहिला आहे.

औद्योगिक क्षेत्रातही निराशा..

अर्थव्यवस्थेच्या गतीचे एक निदर्शक मानले जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन दराची वाढ यंदा खुंटली आहे. प्रामुख्याने निर्मिती, खनिकर्म क्षेत्रातील निरुत्साही वातावरणामुळे मे २०१९ मध्ये देशाचा औद्योगिक उत्पादन दर ३.१ टक्क्यांपर्यंतघसरला आहे. गेल्या मे महिन्यामध्ये हा दर ४ टक्क्यांपुढे होता. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात गणले जाणाऱ्या एकूण २३ उद्योगांपैकी १२ क्षेत्रांनी मे २०१९ मध्ये वाढ नोंदवली आहे.