आर्थिक सुस्तावस्थेशी झगडणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी औद्योगिक क्षेत्रातून आणखी एक वाईट बातमी आली आहे. जुलै महिन्यात उत्पादन वाढीच्या दरात घट झाली असून ती ४.३ टक्के राहिली आहे. जी एक वर्षांपूर्वी याच महिन्यांत ६.५ टक्के इतकी होती. औद्योगिक उत्पादन वाढीच्या दारातील ही घसरण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील निराशाजनक कामगिरीमुळे आल्याचे सरकारने म्हटले आहे.

त्याचबरोबर भाज्यांच्या किंमती वाढल्याने ऑगस्टमध्ये किरकोळ महागाईच्या दरात वाढ होऊन तो ३.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर गेल्या दहा महिन्यांतील सर्वाधिक आहे. यापूर्वीच्या जुलै महिन्यांत हा दर ३.१५ टक्के होता. दरम्यान, अद्याप महागाईच्या दाराचा आकडा हा अजूनही रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या लक्ष्याच्या चौकटीतच आहे. सरकारने गुरुवारी ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

खाण क्षेत्रातील वाढीचा दर जुलै महिन्यांत ४.९ टक्के होता. जो गेल्या वर्षी याच महिन्यांत ३.४ टक्के होता. तर वीज क्षेत्राच्या वाढीचा दर जुलै महिन्यांत ४.८ टक्के होता. तो गेल्या वर्षी ६.६ टक्के होता.

सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये सीपीआय आधारित खाद्य चलनवाढ २.९९ टक्के होती, ही जुलै महिन्यांत २.३६ टक्के होती. तर गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यांत किरकोळ महागाईचा दर ३.६९ टक्के होता. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाईचा दर सुमारे ४ टक्क्यांच्या चौकटीत ठेवण्यास सांगितले आहे.