“भारत चीन संबंधांमध्ये परराष्ट्र खात्याच्या फार मोठा प्रभाव आहे. आपण करार केला म्हणजे त्याचं पालन केलंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. ज्यावेळी चीन कराराचं पालन करत नाही, तर त्यावेळी आपण त्या कराराचं पालन का करावं? अनेकदा ते कराराचा दाखल देऊन आपण उचललेली पावलं योग्य नसल्याचं सांगतात. अनेकदा त्यांच्याकडून कराराचा दाखला देत सरकारला घाबरवण्याचा प्रयत्न होतो. चीनला आंतरराष्ट्रीय न्यायालय, जागतिक आरोग्य संघटना, मानवाधिकार संघटनेची परवा नाही, अशा लोकांबाबत कशाला कायदे पाळायचे? उंटावरुन शेळ्या हाकणारे अनेकजण परराष्ट्र मंत्रालयात आहेत,” असं परखड मत ब्रिग. (नि.) हेमंत महाजन यांनी व्यक्त केलं. लोकसत्ता डॉट कॉमवर डिजिटल अड्डा कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारत चीन संबंधांवर माहिती दिली.

“अनेकदा भारत चीनचे सैनिक समोरासमोर येतात तेव्हा त्या परिस्थितीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते परराष्ट्र खात्यातील लोकांना दाखवावं लागतं. त्यावेळी तुम्ही एवढ्याच जोरात का धक्का दिला, असं का केलं? अशा अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. धक्का कसा आणि किती मारायचा हे शिकवण्यासाठी परराष्ट्र खात्यातील लोकांना सैन्यात दाखल केलं पाहिजे आणि त्यांची याचं प्रात्यक्षिक द्यायला पाहिजे,” असंही ते म्हणाले.

“ही सर्व उंटावरून शेळ्या हाकणारी लोकं आहेत. त्यांनी कधीही सीमा काय आहे हे पाहिलं नाही, सैनिकांच्या समोरिल आव्हानं माहित नाही. सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत त्याचं उत्तर देण्याची परवानगी मिळाली पाहिजे. ती भारत चीन सीमेवर आहे. परंतु चीन सीमेवर व्हिडीओ पाठवावे लागतात. चीनला केवळ आपल्या लष्कराची भाषाच समजते. त्यांच्याशी शांतपणे बोलून चालणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.