एका 64 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची काही अज्ञात लोकांच्या टोळक्याने घरात घुसून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये उघडकीस आला आहे. शनिवारी (दि.27) रात्री कमरोली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील गावामध्ये ही घटना घडली आहे.

अमनुल्लाह असं मृत लष्करी अधिकाऱ्याचं नाव आहे. निवृत्त होण्यापूर्वी भारतीय लष्करात ते कॅप्टन म्हणून सेवेत होते. टोळक्याने लाकडी दांडक्यांच्या सहाय्याने अमनुल्लाह यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांचा जागीत मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली. याबाबत बोलताना घटनेचा तपास करणारे सहायक पोलीस अधीक्षक दयाराम यांनी सांगितलं की, ‘ आम्हाला अमनुल्लाह यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार अमनुल्लाह आणि त्यांची पत्नी हे दोघंच घरात होते, अचानक काही अज्ञात लोकांचं टोळकं घरात घुसलं आणि लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी अमनुल्लाह यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला’.

‘शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे’ अशी माहितीही पोलीस अधिकारी दयाराम यांनी दिली. या घटनेमुळे कमरोली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील ‘गोडिया का पुरवा’ या गावात मात्र खळबळ उडाली आहे.