मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई हे रविवारी निवृत्त होत असून त्यांच्या कारकीर्दीचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता. ते क्रमांक एकच्या न्यायालयात  खटल्याच्या सुनावणीसाठी  नियोजित सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमवेत चार मिनिटे  न्यायमंचावर होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खन्ना यांनी गोगोई यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. गोगोई यांनी नंतर राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहून कारकीर्दीचा शेवट केला. गेल्या वर्षी तीन ऑक्टोबर रोजी त्यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली होती. गोगोई यांनी त्यांच्या कारकीर्दीत राम जन्मभूमी -बाबरी मशीद वाद निकाली काढला.  ९ नोव्हेंबरला त्याबाबत एकमताने दिलेल्या निकालात अयोध्येतील जागा राम लल्ला विराजमान या हिंदू गटाच्या मालकीची  असल्याचे सांगून मंदिर उभारणीसाठी सरकारने ट्रस्ट स्थापन करावा तसेच  मशिद बांधण्यासाठी अयोध्येत मध्यवर्ती ठिकाणी पाच एकर जागा द्यावी असा आदेश देण्यात आला होता. गतवर्षी जानेवारी महिन्यात चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद  घेऊन सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यात गोगोई यांचाही समावेश होता.