भारतातील प्रसिद्ध फोटोग्राफर दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानमधील कंधार येथे मृत्यू झाला आहे. दानिश हे रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काम करायचे. दानिश हे रॉयटर्सचे भारतामधील प्रमुख फोटोग्राफर होते. सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाचे वृत्तांकन करण्यासाठी दानिश अफगाणिस्तानमध्ये गेले होते. तिथे वृत्तांकन करतानाच त्यांचा मृत्यू झाला.

अफगाणिस्तानमध्ये गेलेले ४० वर्षीय दानिश हे गुरुवारी रात्री कंधारमधील स्पिन बोल्डक परिसरामध्ये अफगाणिस्तान लष्कराच्या तुकडीसोबत फोटो काढण्यासाठी गेले होते. अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजच्या वृत्तानुसार त्यावेळी अफगाण लष्कर आणि तालिबान्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये दानिश यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला. नक्की त्या ठिकाणी काय घडलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

भारताचे अफगाणिस्तानमधील राजदूत फरीद ममुन्दजई यांनी दानिश यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तालिबानने बुधवारी स्पिन बोल्डक शहर आणि तेथूनच जवळ असणाऱ्या पाकिस्तानी सिमेला लागू असलेला भाग आपल्या ताब्यात घेतला आहे.

मृत्यूच्या दोन दिवस आधीपर्यंत दानिश ट्विटरवरुन अफगाणिस्तानमधील घडामोडी आणि तेथे वृत्तांकन करताना येणाऱ्या अडचणी, समस्यांबद्दल ट्विटरवरुन माहिती देत होते. एका हल्ल्यामध्ये आपण थोड्यात वाचल्याचंही दानिश यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन आपल्या फॉलोअर्सला कळवलं होतं.

कालच दानिश यांनी कंधारमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाची झलक दाखवणारे काही फोटो आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केले होते. दानिश हे दिल्लीमध्ये वास्तव्यास होते. त्यांनी जामिया मालिया इस्लामिया येथून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं.

दानिश यांना २०१७ साली रोहिंग्या संकटाच्या कालावधीमध्ये काढलेल्या एका फोटोसाठी पत्रकारिता क्षेत्रात छायाचित्रकारांना देण्यात येणारा सर्वोच्च असा पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं. तसेच दिल्लीमधील दंगली, करोना कालावधीमध्ये प्रवासी मजुरांना सामाना करावी लागलेली संकटं आणि करोना काळात स्मशनांमधील दानिश यांनी काढलेले फोटो चांगलेच चर्चेत आलेले.