एमबीबीएस, बीडीएस व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) रद्द करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘संकल्प’ या स्वयंसेवी संस्थेने ही याचिका प्रख्यात वकील प्रशांत भूषण यांच्या मार्फत याचिका दाखल केली असून त्यात ‘नीट ’ परीक्षा रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या १८ जुलैच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय पात्रता अथवा प्रवेश परीक्षा (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-नीट) रद्दबातल केली होती. या परीक्षेमुळे राज्य सरकारी व खासगी संस्थांच्या हक्कांवर गदा येत असल्याचे कारण न्यायालयाने दिले होते. ‘नीट’ ही परीक्षा भारतीय वैद्यक परिषदेच्या वतीने घेतली जात होती व त्यात प्रवेश प्रक्रियेत सौदेबाजी होऊ नये हाच हेतू होता, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांचा कोटय़वधी रुपयात सौदा केला जात असे.
नीट परीक्षा रद्द केल्याने प्रवेश प्रक्रियेत भ्रष्टाचार होईल यासह इतर मुद्दय़ांच्या आधारे फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. तत्कालीन सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांच्या नेतृत्वाखालील पीठाने ही परीक्षा रद्दबातल करण्याचा निकाल २-१ असा मतांनी दिला होता, पण हा अल्पमतातील निकाल होता व  सरन्यायाधीश निवृत्त होत असल्याने न्यायाधीशांमध्ये फारशी चर्चा न करताच हा निकाल देण्यात आला, त्यामुळे त्याचा फेरविचार करावा असे आताच्या याचिकेत म्हटले आहे.