News Flash

रुग्णांच्या गृहविलगीकरणासाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारकडून जारी

घरी असताना रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करू नये आणि केवळ रुग्णालयातच हे इंजेक्शन रुग्णाला दिले जावे

(संग्रहित छायाचित्र)

कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या किंवा कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या गृहविलगीकरणासाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केल्या. घरी असताना रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करू नये आणि केवळ रुग्णालयातच हे इंजेक्शन रुग्णाला दिले जावे, असा सल्ला त्यात देण्यात आला आहे.

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना तोंडावाटे स्टेरॉइड्स दिले जाऊ नयेत व सतत ताप, वाढत जाणारा खोकला इ. लक्षणे सात दिवसांहून अधिक काळ कायम राहिल्यास कमी मात्रेतील ओरल स्टेरॉइड्सच्या उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला जावा, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

६० वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांना, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, फुप्फूस, यकृत किंवा मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण यांसारख्या सहव्याधी असलेल्या लोकांनाच उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत योग्य तपासणीनंतर गृहविलगीकरणाची परवानगी दिली जावी, असे सुचवण्यात आले आहे.

प्राणवायूचे प्रमाण कमी होत असल्यास किंवा श्वाासोच्छवासास त्रास होत असल्यास संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले जावे आणि त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घेतला जावा, असे या सूचनांमध्ये म्हटले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयातून घरी

करोनाची लागण झाल्याने येथील एम्समध्ये दाखल करण्यात आलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना गुरुवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

देशात करोनाचा नवा उच्चांक

देशात गेल्या एका दिवसात करोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा नवा उच्चांक गाठला. गेल्या २४ तासांत तीन लाख ७९ हजार २५७ जणांना करोनाची लागण झाली त्यामुळे बाधितांची एकूण संख्या एक कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली, तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने ३० लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या एका दिवसात करोनामुळे ३६४५ जणांचा मृत्यू झाला असून हाही एक उच्चांक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 1:00 am

Web Title: revised guidelines for home quarantine of patients issued by central government abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लालूप्रसाद यादव यांची जामिनावर सुटका
2 देशात लसटंचाई नाही!
3 सत्ताधाऱ्यांकडेच कल
Just Now!
X