कानपूरमध्ये झालेल्या चकमकीत ८ पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विकास दुबेचा सध्या उत्तर प्रदेश पोलीस राज्यभरात शोध घेत आहे. कानपूरमध्ये अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गोळीबार झाल्याच्या घटनेपासून दुबे फरार आहे. पोलिसांनी दुबेची माहिती देणाऱ्यांना इनाम देण्याची घोषणा केली होती. इनामाच्या रकमेत आणखी वाढ करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली.

आठ पोलिसांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आरोपी विकास दुबे ७२ तास उलटूनही पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. पोलिसांनी विकास दुबेला अटक करण्यासाठी सगळीकडे छापेमारी सुरू केली आहे. मात्र त्याचा अद्याप सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी विकास दुबेची माहिती देणाऱ्या इनामाची घोषणा केली होती. त्या रकमेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. इनामाची रक्कम अडीच लाख करण्यात आली आहे.

दुबेला आधीच मिळाली होती कारवाईची माहिती

अग्निहोत्री याने जाबजबाबात या चकमकीच्या संदर्भात काही माहिती पोलिसांना दिली होती. विकास दुबे याला चौबेपूर पोलीस ठाण्यातून फोन आला होता. तीन पोलिस ठाण्यांचे पथक बिल्होरचे परिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली दुबे याला अटक करण्यासाठी येत आहे, अशी माहिती  फोनद्वारे मिळाली होती. हा फोन एका पोलिसाने केला होता. मध्यरात्रीनंतर हा छापा पडणार असल्याचीही आगाऊ सूचना दुबे टोळीला मिळाली होती. जेव्हा पोलिस कानपूर देहातमधील बिक्रू खेडय़ात छापा टाकण्यासाठी आले तेव्हा दुबे याच्या समवेत त्याचे २५ साथीदार उपस्थित होते.