शेतकऱ्यांचे मुक्या प्राण्यांवर असलेले जीवापाड प्रेम सर्वश्रुत आहेच. आपल्या लेकरांप्रमाणे शेतकऱ्यांकडून मुक्या प्राण्यांचा सांभाळ केला जातो. मुक्या प्राण्यांवर त्यांचा किती जीव असतो, हे दाखवणारे एक उदाहरण उत्तर प्रदेशमध्ये समोर आले आहे. जन्मापासून सांभाळलेला बैल हरवल्यामुळे खजुही गावातील मनोज पांडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, बैल शोधून देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे बैल हरवल्यानंतर मनोज पांडे यांनी उपवास धरला आहे.
बैल हरविल्यानंतर पांडे यांनी २ एप्रिलला सारनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बैलाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस कर्मचारी रवाना केले. पण बैल काही सापडला नाही. बादशहा असे या बैलाचे नाव आहे. त्याला शोधून देणाऱ्यासाठी ५० हजार रुपयांचे बक्षिसही पांडे यांनी जाहीर केले आहे. बादशहा जन्मापासून माझ्यासोबत होता. तो हरवल्यामुळे मला माझा मुलगाच हरवल्यासारखे वाटते आहे. मला किती दुःख झाले आहे, याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असे पांडे यांनी पत्रकारांना सांगितले. बादशहाचा जन्म झाल्यानंतर महिन्याभरातच त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्यांच्या गाईकडून दूध काढून ते बादशहाला पाजण्यात आले, अशीही आठवण मनोज पांडे यांनी सांगितली.
बादशहा बैलाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस पथकही रवाना करण्यात आले आहे, असे सारनाथचे पोलीस निरीक्षक महेंद्रप्रसाद यादव यांनी सांगितले.