अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक केली. रियाला अटक करण्यात आल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते ट्विटरपर्यंत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दिल्लीतील पोलीस खात्याचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) वेद भूषण यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रियाच्या विरोधात दाखल करण्यात आलेला खटला खूपच तकलादू आणि हस्यास्पद आहे. रियावर जेवढे अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे तेवढा गांजा तर दिल्लीतील रस्त्यावर मिळतो, असं भूषण यांनी म्हटलं आहे.

रियाकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले नाहीत त्यामुळे दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि एकंदरितच रियाविरोधातील ही केस खूपच तकलादू आहे, असं भूषण यांनी म्हटलं आहे. अशा प्रकरणांमध्ये आपल्याकडे अमली पदार्थ नव्हते आणि त्यांच्याशी आपला काहीही संबंध नाही हे आरोपीला सिद्ध करावं लागतं असा हा कायदा आहे. इतर सर्व गुन्ह्यांमध्ये आरोप करणाऱ्यांना आरोपीने गुन्हा केला आहे सिद्ध करावं लागतं. अमली पदार्थासंदर्भातील कायदा हा एकमेव असा कायदा आहे ज्यामध्ये आरोपीला जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ आपल्याकडे मिळाले नाहीत आणि त्यामध्ये आपला काहीही सहभाग नाही हे सिद्ध करावं लागतं.  अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याचा मृत्यू झाला आहे आणि मुख्य म्हणजे रियाकडे अमली पदार्थ सापडलेले नाहीत त्यामुळे या खटल्यामध्ये फारसा दम नाही. आपला या अमली पदार्थांशी काहीही संबंध नाही ही एकमेव गोष्ट रियाला या प्रकरणामध्ये सिद्ध करावी लागणार आहे, असं भूषण यांनी ‘न्यूज २४’ या वृत्तवाहिनीमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले.

“दिल्लीत तुम्ही रस्त्यावरुन फिरलात तरी तुम्हाला अमली पदार्थ मिळतील. मी इथे बसून तुम्हाला अशा जागांबद्दल सांगू शकतो जिथे १००-१०० ग्रामच्या गांजाच्या पुड्या सहज मिळतात. हे खूपच हस्यास्पद आहे,” असं म्हणत भूषण यांनी दिल्ली पोलिसांच्या कारभारावर निशाणा साधला.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक करण्यात आलेला आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते. सावंतने दिलेल्या माहितीच्या आधारे रविवारी एनसीबीने रियाकडे चौकशी सुरू केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रियाला अटक करण्यात आली. दीपेश सुशांतचा नोकर होता. १४ जूनला सुशांत वांद्रे येथील ‘मॉन्ट ब्लॅक’ इमारतीतील निवासस्थानी मृतावस्थेत आढळला. तेव्हा मित्र सिद्धार्थ पिठानी, आचारी नीरज सिंह, के शव बचनेर यांच्यासह दीपेशही तेथे उपस्थित होता. अमली पदार्थाच्या खरेदी-विक्री प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर एनसीबीने दीपेशकडे चौकशी सुरू केली आणि त्यामधूनच पुढे रियावर कारवाई झाली.