ख्रिश्चन धर्मातील व्यक्ती म्हणून आता भारतात वावरताना असुरक्षित वाटते, ही माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरोंची प्रतिक्रिया ऐकून वाईट वाटल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी सांगितले. मी याबाबत नरेंद्र मोदींशी बोललो असून त्यांनीदेखील रिबेरो यांच्या वक्तव्याबद्दल काळजी व्यक्त केल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

अल्पसंख्य समाजाच्या चर्च किंवा मशिदींवर हल्ला चढविणाऱ्या कोणालाही आम्ही पाठीशी घालणार नाही, असे गडकरी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ आयोजित ‘आयडिया एक्सचेंज’ या कार्यक्रमात सांगितले. आमच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यामुळे आम्ही अल्पसंख्य समाजाचे रक्षण करू, अशी ग्वाही गडकरींनी यावेळी दिली. ज्युलिओ रिबेरो यांच्याबाबत बोलायचे झाले तर, ते आमचे राष्ट्रीय आदर्श आहेत. रिबेरो यांच्याकडे केवळ अल्पसंख्य समाजाची व्यक्ती म्हणून पाहणे योग्य ठरणार नसल्याचे मी भेटीदरम्यान पंतप्रधानांना सांगितले. त्यांनी देशासाठी ज्याप्रकारचे कार्य केले आहे त्यावरून ते संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत. विशेषत: मुंबईत काम करताना त्यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता उल्लेखनीय आहे. त्यामुळे मी त्यांचा खूप आदर करतो. परंतु, त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेले वक्तव्य ऐकून मला फार वाईट वाटले. त्यांच्या या विधानाचा आपल्याला गंभीरपणे विचार केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मोदी सरकार अल्पसंख्याकाच्या विरोधात असल्याची प्रतिमा विरोधी पक्षांनी तयार केली आहे. संसदेत प्रत्येक दिवशी कामकाजासाठी नवा मुद्दाच नसतो. आमचे सरकार सत्तेत आल्यापासून डावे पक्ष, काँग्रेस आणि भाजपविरोधी असलेले राजकीय पक्ष सतत आमच्याविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. भीती हे त्यांचे मोठे भांडवल आहे, त्यामुळे अल्पसंख्य समाजाने सरकारविषयीचे मनातील भय काढून टाकावे, असा सल्ला गडकरींनी यावेळी दिला. याशिवाय, आम्ही सकारात्मक निधर्मीवादावर विश्वास ठेवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्युलिओ रिबेरो यांनी १७ मार्च रोजी ‘द इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रामध्ये लिहलेल्या लेखामध्ये, केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून ख्रिश्चनांना जाणुनबुजून लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले होते. यामुळे शांतताप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिश्चनांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत असल्याचे मत, त्यांनी या लेखात व्यक्त केले होते.