ऑक्सफॅमचा अहवाल

जगातील तापमानवाढीस जगातील १० टक्के श्रीमंतच जबाबदार आहेत कारण ते जीवाश्म इंधने जाळून वातावरणात कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करीत आहेत व ते प्रमाण कार्बन डायॉक्साईडच्या एकूण प्रमाणाच्या निम्मे आहे, असे ऑक्सफॅम या ब्रिटिश संस्थेने अहवालात म्हटले आहे.
ऑक्सफॅमच्या अहवालात श्रीमंत देशांनाच तापमानवाढीस जबाबदार ठरवले आहे. पॅरिस येथील जागतिक हवामान परिषदेत पृथ्वीचे तापमान कुणामुळे वाढले याबाबत तू-तू मैं-मैं सुरू असताना हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पॅरिस येथील परिषदेत १९५ देश सहभागी आहेत. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाची जबाबदारी कशी वाटून घेणार, हवामान बदलांना बळी पडत असलेल्यांना देशांची मदत कशी करणार, असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. ऑक्सफॅमच्या हवामान धोरणाचे प्रमुख टिम गोर यांनी सांगितले की, श्रीमंत लोक किंवा देशांनाच कार्बन उत्सर्जनास जबाबदार धरले पाहिजे मग ते कुठेही राहात असोत. विकसनशील देशात गरिबांचे प्रमाण जास्त असले तरी अजूनही कार्बन उत्सर्जनास श्रीमंत देशच जबाबदार आहेत. अहवालात म्हटले आहे की, सरासरी १ टक्का श्रीमंत लोकसंख्येपैकी एक माणूस तळाकडील दहा टक्के गरीब व्यक्तींच्या तुलनेत १७५ टक्के व्यक्तींपैकी एका माणसाच्या तुलनेत १७५ पट अधिक कार्बन डायॉक्साईड वातावरणात सोडतो.
श्रीमंत व विकसनशील देश यांच्यात कार्बन व हरितगृह वायू उत्सर्जनाची जबाबदारी कशी वाटून घ्यायची यावर मतैक्य नाही. कोळसा, तेल व गॅसच्या ज्वलनातून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती जास्त होते. विकसनशील देशांच्या मते पाश्चिमात्य देश आधीपासूनच प्रदूषित आहेत व त्यांचा वाटा कार्बन उत्सर्जनात जास्त आहे. हरितगृह वायू व कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी विकसनशील देशांना हरित तंत्रज्ञान व आर्थिक मदत हवी आहे. सागरी पातळीत वाढ, दुष्काळ, चक्रीवादळे यासारखे परिणाम जागतिक तापमानवाढीमुळे दिसून येतात. दरडोई कार्बन उत्सर्जनाचा विचार करण्यापेक्षा एकूण आकारमानाचा विचार करता चीन व भारत हे जास्त कार्बन डायॉक्साईड सोडतात असे अमेरिकेचे मत आहे. विकसनशील देशांमुळे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढते असा जो आरोप केला जातो त्याला ऑक्सफॅमच्या अहवालाने उत्तर दिले आहे.