राज्यसभेच्या ५८ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. बिहामधून संयूक्त जनता दलाचे (जेडीयू) उमेदवार महेंद्रप्रसाद सिंह यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्जात उल्लेख केल्याप्रमाणे महेंद्रप्रसाद सिंह यांची संपत्ती तब्बल ४ हजार कोटी रूपये आहे. राज्यसभेतील त्यांची ही सातवी टर्म असेल. इतकेच नव्हे तर त्यांनी २११ देशांचा दौराही केलेला आहे.

आपल्या घोषणापत्रकात महेंद्रप्रसाद यांनी चल आणि अचल संपत्तीचा खुलासा केला आहे. त्यानुसार महेंद्रप्रसाद यांच्याकडे ४,०१०.२१ कोटी रूपयांची चल संपत्ती तर २९.१ कोटी रूपयांची अचल संपत्ती आहे.

महेंद्रप्रसाद हे मैप्रा लॅबॉरेटरीज प्रा. लि. आणि अरिस्टो फार्मास्टयुटिकल या दोन फार्मास्टयूटिकल कंपनीचे मालक आहेत. विशेष म्हणजे महेंद्रप्रसाद यांच्याकडे कोणतीही मोटार वाहन किंवा विमा पॉलिसी नाही. पण सुमारे ४१ लाखांहून अधिकचे सोन्याचे दागिणे आहेत. त्यांनी २०१६-१७ च्या प्राप्तिकर विवरण पत्रात आपले एकूण उत्पन्न ३०३.५ कोटी रूपये दाखवले होते.

महेंद्रप्रसाद यांनी १९८० मध्ये पहिल्यांदा जहानाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला होता. पण १९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसची लाट असतानाही ते पराभूत झाले होते. त्यानंतर काँग्रेसने त्यांना १९८५ मध्ये राज्यसभेवर पाठवले होते. तेव्हापासून ते काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि जेडीयूकडून राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत.

महेंद्रप्रसाद यांना सर्वाधिक देशांचा दौरा करणारे खासदार म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी २११ देशांचा प्रवास केला आहे. त्यांनी ५३ वेळा ब्रिटनचा तर दहावेळा अमेरिकेचा दौरा केला आहे. ते ९ एप्रिल २००२ ते ८ एप्रिल २००३ या एका वर्षाच्या कालखंडात ८४ देशांना भेट दिली होती.