अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना ‘रायसिन’ हे अत्यंत जहाल विष लावलेले पत्र पाठविणाऱ्या मिसिसिपी येथील आरोपीस अटक करण्यात आली. पॉल केव्हिन कुर्टीस असे या आरोपीचे नाव असून तो ४५ वर्षांचा आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याला १५ वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुर्टीस याने अमेरिकेच्या अध्यक्षांना विष लावलेले पत्र पाठवून त्यांना जबर इजा करण्याचा तसेच मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.  सिनेट सदस्य रॉजर विकर, मिसिसिपी येथील न्यायाधिकारी आणि ओबामा यांना कुर्टीस याने पत्रे पाठविली होती.
त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याला १५ वर्षे कारावास, ५ लाख डॉलर इतका दंड होईल तसेच प्रत्यक्ष सुटकेनंतरही तीन वर्षे त्याच्यावर पोलिसांची नजर असेल, असे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनतर्फे सांगण्यात आले.