हिंदू दहशतवादाबाबतच्या वक्तव्यांबद्दल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यावर समाधान मानण्यास राजी नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. त्याचवेळी शिंदे यांनी राजकीय भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून त्यांनी जी विधाने केली ती मागे घेतलेली नाहीत, असे काँग्रेसनेही गुरुवारी जाहीर केल्याने संसद अधिवेशनाच्या तोंडावरच शिंदे यांच्या शेरेबाजीचा मुद्दा पुन्हा तापणारच असल्याची लक्षणे आहेत. आधी या दिलगिरीवर समाधान मानलेल्या भाजपचा पुढचा पवित्रा काय असणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.
शिंदे यांनी जयपूरमध्ये केलेली वक्तव्ये ही अवमानकारक आणि प्रतिमा मलीन करणारी होती. त्यांनी नुसती दिलगिरी व्यक्त करणे पुरेसे नाही. त्यांनी माफी मागायला हवी आणि पाकिस्तानी दहशतवादाचा निषेध करायला हवा, असे मत संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी ‘ट्विटर’वर नोंदवले. शिंदे यांच्या विधानांनी भारताचीच बाजू कमकुवत होत आहे आणि देशद्रोह्य़ांनाच त्याचा वापर करता येणार आहे, असेही माधव यांनी म्हटले आहे. संघाच्या या भूमिकेविषयी छेडले असता भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी, शिंदेंचा विषय आमच्यापुरता संपलेला आहे, असे स्पष्ट केले खरे. पण त्यानंतर काँग्रेसने या मुद्दय़ाची धग आणखी तीव्र करणारी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस प्रवक्ते पी. सी. चाको यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, सिंसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत व्हावे म्हणूनच शंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. गृहमंत्री पद सांभाळणाऱ्या शिंदे यांनी जी विधाने केली ती वस्तुस्थितीवर आधारितच असतील पण कोणत्याही राजकीय पक्षाचा रोष ओढवून घ्यायच्या मनस्थितीत आम्ही नाही. शिंदे जे बोलले ते पुरावे असल्यामुळेच बोलले पण कोणाच्याही राजकीय भावना दुखावण्याचा त्यांचा इरादा नव्हता. त्या दुखावल्यापुरतीच दिलगिरी त्यांनी व्यक्त केली आहे, असा दावा चाको यांनी केला. शिंदे यांनी आपल्या विधानांपासून फारकत घेतलेली नाही, असेही चाको यांनी ठामपणे सांगितले. शिंदे यांनी आपली विधाने कधीच नाकारलेली नाहीत. त्यांच्या विधानांत विसंगती नाही. पण आम्ही संपर्क आणि संवाद या माध्यमातून सकारात्मक वृत्तीने काम करू इच्छितो. त्यामुळेच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, असेही चाको म्हणाले.