देशातील लेखकांकडे निषेध करण्यासाठी कुठलेही इतर मार्ग उरलेले नसल्याने साहित्य अकादमी पुरस्कार परत करणे हाच एक मार्ग होता, असे साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारे उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी म्हटले आहे.

आतला आवाज आपल्याला जे सांगत होता त्यानुसार आपण हा पुरस्कार परत केला, साहित्यिकांकडे पुरस्कार परत करण्यापलीकडे दुसरा ठोस मार्ग नव्हता असे सांगून ते म्हणतात की, आमच्यावर टीका झाली असली तरी दुसरा मार्ग नव्हता. या वयात आपण धरणे धरू शकत नाही, उपोषण करू शकत नाही, आम्ही लिहू शकतो पण लिहिणाऱ्यांचे काय होते ते आपण कलबुर्गी प्रकरणातून पाहिले. हम कलम के सिपाही हैं.. त्यामुळे लेखनासाठी दिलेला पुरस्कार परत करणे योग्यच होते. तोच विरोधाचा अधिक शक्तिशाली मार्ग होता. राणा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात जाहीरपणे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली, देशातील अलीकडच्या घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत असे कारण त्यासाठी त्यांनी दिले. ज्या साहित्यिकांनी आताच्या परिस्थितीत पुरस्कार परत केले त्यांना आपला पाठिंबा आहे. समाजातील काही व्यक्तींनी केलेल्या कृत्यांना दहशतवाद म्हणायचे व दुसऱ्या काही व्यक्तींनी केलेल्या कृत्यांना दहशतवाद म्हणायचे नाही हा दुटप्पीपणा आहे. अशा स्थितीत पुरस्कार परत करणे योग्य आहे. आता आपण कुठलाही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही. आमच्या पिढीनेही तसेच करावे. देशातील दहशतीचे वातावरण संपले पाहिजे ते संपले नाही तर आपण संपून जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी एकावेळी एकच गोष्ट होऊ शकते.