काँग्रेसचा इराणींविरोधात तर भाजपचा ज्योतिरादित्यांविरोधात कारवाईचा आग्रह
हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी दिशाभूल केल्याच्या आरोपावरून काँग्रेस व डाव्या पक्षांनी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्याच दिवशी केला असताना मंगळवारी भाजपने त्याचा सूड घेण्यासाठी काँग्रेसचे मुख्य प्रतोद ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर केंद्रीयमंत्री बंदारू दत्तात्रेय यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केल्याच्या प्रकरणी हक्कभंग मांडण्याचा आग्रह धरला. त्यांनी त्यासाठीची नोटीस लोकसभाध्यक्षांकडे दिली आहे.
भाजपचे मुख्य प्रतोद अर्जुन राम मेघवाल यांनी शिंदे यांच्यावर असा आरोप केला, की हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेला विद्यार्थी रोहित वेमुला याला राष्ट्रद्रोही, जातीयवादी व अतिरेकी असे मंत्री दत्तात्रेय यांनी संबोधले होते असा उल्लेख ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला, तो दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे आपण व दत्तात्रेय यांच्यासह अनेकांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली आहे. सभागृहाचे कामकाज आज सुरू झाले तेव्हा एअरसेल मॅक्सिसप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात कारवाईची मागणी करीत अद्रमुक सदस्यांनी गोंधळ केला, त्यामुळे काँग्रेस सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर आले व त्यांनी इराणी यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावावर निर्णय देण्याची मागणी केली. दत्तात्रेय यांनी शिंदे यांच्यावर बदनामी करून प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला. वेमुला हा दलित होता असे मी कधी म्हणालो नाही, तरी ज्योतिरादित्य यांनी ते वाक्य माझ्या तोंडी घालून बदनामी केली. माझी आई कांदे विकत होती. मी ओबीसी व दलितांसाठी काम केलेले आहे. त्यांच्यासाठी त्याग केलेला आहे असेही ते म्हणाले. जे पत्र मी इराणी यांना पाठवले होते, त्याच्या आधारे काँग्रेसने माझ्यावर टीका केली, पण त्यात वेमुलाचे नाव नाही. त्याच्यावर मी कोणाताही आरोप केला नव्हता.
काँग्रेस सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवला तेव्हा के. सी. वेणुगोपाळ यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना नियमांचे पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यावर नियमांचे पुस्तक मला दाखवू नका. मला माहिती आहे असे त्या म्हणाल्या. महाजन यांनी इराणी यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव विचाराधीन आहे असे आश्वासन दिले व सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस व अद्रमुकच्या सदस्यांनी तरी गोंधळ सुरूच ठेवल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. स्मृती इराणी यांनी रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी दिशाभूल केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात काँग्रेसने हक्कभंगाची नोटीस दिली आहे.