मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. १५० अब्ज डॉलर्स बाजार मूल्य (मार्केट कॅप) असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

रिलायन्स इंडस्‍ट्रीजच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत असल्याने मार्केट कॅपमध्येही वाढ होत आहे. सोमवारी सकाळी बीएसईमध्ये रिलायन्स इंडस्‍ट्रीजचे बाजार मूल्य 28,248.97 कोटी रुपयांनी वाढून 11,43,667 कोटी (150 अब्ज डॉलर्स) रुपये झाले. सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर बीएसईमध्ये रिलायन्सच्या शेअर्सनी 2.53 टक्क्यांची उसळी घेत 1804.10 रुपयांचा विक्रमी स्तर गाठला. तर, एनएसईमध्येही कंपनीच्या शेअर्सनी 2.54 टक्क्यांनी उसळी घेत 1804.20 रुपयांचा स्तर गाठला.

यापूर्वी शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजने पुढील वर्षापर्यंत स्वत:ला पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट आपल्या नियोजित वेळेपूर्वीच साध्य केल्याचे जाहीर केले. अंबानी यांनी रिलायन्सच्या ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समुहावरील कर्ज मार्च 2021 पर्यंत फेडण्याचे आश्वासन भागधारकांना दिले होते. मात्र 10 महिन्यांतच ते फेडण्यात आले असून त्यासाठी प्रत्यक्ष निधी उभारणी अवघ्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओमध्ये अनेक परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली. काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या एका कंपनीनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली होती. ही रिलायन्स जिओमधील दहावी गुंतवणूक होती. रिलायन्स जिओच्या आतापर्यंत 24.70 टक्के हिस्स्याची विक्री करण्यात आली आहे. याद्वारे कंपनीनं 1.6 लाख कोटी रूपयांची रक्कम जमवली आहे.