रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत असून, चीनमधील ऑनलाइन रिटेल क्षेत्र (किरकोळ विक्री क्षेत्र) गाजवणाऱ्या अलिबाबा समूहाप्रमाणे ई-कॉमर्स कंपनी सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. यासाठी अंबानींनी ‘डिजिटल सर्विस होल्डिंग कंपनी’ उभारण्याची 24 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1.6 लाख कोटी रुपयांची योजना देखील तयार केल्याचं वृत्त आहे.

रिलायन्स कंपनी टेक व इंटरनेट क्षेत्रात गुंतवणूक आणि अधिग्रहण वाढवण्यावर भर देतेय कारण, जिओच्या माध्यमातून मोठ्या संख्येत ग्राहकवर्गापर्यंत पोहोचल्यानंतर ई-कॉमर्स सारखी सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मंडळाने 15 बिलियन डॉलर्स पूर्णपणे मालकीच्या सहाय्यक कंपनीत गुंतवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ई-कॉमर्स कंपनीद्वारे रिलायन्स भारतात इंटरनेट शॉपिंगमध्येही वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑनलाइन किरकोळ बाजारपेठेत रिलायन्सने प्रवेश केल्यास देशातील 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ई-कॉमर्स बिझनेस मार्केटवर परिणाम होईल , असे तज्ज्ञांचे मत आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती जवळपास 56 बिलियन डॉलर म्हणजेच 3.85 हजार कोटी रुपये आहे. मात्र, रिलायन्स ऑईल अॅण्ड केमिकल व्यवसायातील 20 टक्के भागीदारी सौदी अरेबियाच्या तेल कंपनीला विकल्यामुळे आता मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती जवळपास 75 बिलियन डॉलर इतकी आहे. अशात येत्या काही वर्षांमध्ये ई-कॉमर्स सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याची अंबानींची योजना आहे. RIL ने सुरुवातीला डिजीटल प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी 1,08,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची परवानगी घेतल्याची माहिती आहे.