पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ एप्रिलला म्हणजेच शनिवारी देशातल्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत करोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. आता १४ एप्रिल ही तारीख जवळ येते आहे. त्या पार्श्वभूमीवर काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलनंतर एकाचवेळी लॉकडाउन पूर्णपणे हटवला जाणार नाही असं म्हटल्याचं पिनाकी मिश्रा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी काय संवाद साधतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. करोनाशी लढण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातले सगळे व्यवहार ठप्प झाले आहेत.

हातावर पोट असलेल्यांचं सगळ्यात जास्त हाल होत आहेत. सरकारकडून त्यांच्यासाठीच्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत आणि येत आहेत. दोन दिवसांपूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. आता शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून राज्यांमधली काय स्थिती आहे ते जाणून घेतील. त्यानंतर ते महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.