श्रीलंकेत जेलमध्ये दंगल उसळली असून जवळपास आठ कैद्यांचा मृत्यू झाला आहे तर ३७ जण जखमी झाले आहेत. रविवारी कोलंबोपासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या महारा जेलमध्ये ही दंगल झाली. काही कैद्यांनी जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार घडला. पीटीआयने यासंबधी वृत्त दिलं आहे.

महारा कारागृहातील कैद्यांनी दरवाजातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारागृह प्रशासनाला त्यांच्याविरोधात बळाचा वापर करावा लागला अशी माहिती पोलिसांनी दिला आहे. कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झााल होता. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कारागृह अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करावी लागली.

“रिमांडमध्ये असणाऱ्या काही कैद्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडण्याचा आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला,” अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली आहे. कैद्यांनी यावेळी किचन तसंच रेकॉर्ड रुमला आग लावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हिंसाचारात एकूण ३७ जण ज्यामध्ये दोन जेलरचाही समावेश आहे जखमी झाले आहेत. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान काही कैद्यांनी जेलरला ओलीस ठेवण्याचाही प्रयत्न केला होता. पण अधिकाऱ्यांना प्रयत्न हाणून पाडला.