News Flash

…तरीही माझा फाटक्या जीन्सला विरोध; टीकेनंतरही तीरथ सिंह रावत विधानावर ठाम

काय म्हणाले मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत?

संग्रहित छायाचित्र

उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचं नाव मागील दोन-तीन दिवसांपासून देशभर गाजत आहे. फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असं विधान रावत यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली. टीकेचे धनी ठरल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. वादग्रस्त विधानावर बोलताना “आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही, पण फाटक्या जीन वापरण्याला विरोधच आहे,” असं रावत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “CM साहेब, जीन्स नाही तुमचा मेंदू फाटलाय”; महिला नेत्या तीरथ सिंह रावतांवर संतापल्या

तीरथ सिंह रावत यांनी बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना वक्तव्य केलं होतं. ज्याचे देशभरात पडसाद उमटले. सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचं म्हटलं. “माझा महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही. पण, फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच आहे,” असं रावत यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते रावत?

“एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. लोकांना भेटते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करते. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं,” असंही रावत म्हणाले. तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल,” असं विधान रावत यांनी केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 10:08 am

Web Title: ripped jeans controversy still object to ripped jeans uttarakhand cm tirath singh rawat bmh 90
Next Stories
1 फाटकी जीन्स प्रकरण : RSS च्या नेत्यांचा हाफ चड्डीमधील फोटो पोस्ट करत प्रियंका गांधी म्हणाल्या, “अरे देवा…”
2 ‘अझान’मुळे झोपमोड होत असल्याची तक्रार; पोलीस महानिरीक्षकांनी लाऊडस्पीकरवर आणली बंदी
3 मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशमध्ये विक्रमी सामुदायिक विवाह
Just Now!
X