इस्रोने कोणत्याही हवामानात यशस्वीरित्या काम करू शकणाऱ्या रडार इमेज मॉनिटरिंग उपग्रह RISAT-2B चे बुधवारी पहाटे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले. जवळपास सात वर्षांनंतर भारताने अशा प्रकारच्या मॉनिटरिंग उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. या उपग्रहाद्वारे खराब हवामान असतानातही भारताला देशाच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा उपग्रह महत्त्वाचा मानला जात असून बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकसारख्या कारवायांचे फोटोही घेणेही आता शक्य होणार आहे.

पीएसएलवी-सी ४६ च्या ४८ व्या मोहीमेअंतर्गत बुधवारी पहाटे साडेपाच वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून RISAT-2B या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह ६१५ किलो वजनाचा असून प्रक्षेपणाच्या १५ मिनिटानंतर पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला. २००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर RISAT-2B या उपग्रहाच्या पक्षेपणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. RISAT-2B च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो आता अन्य मॉनिटरिंग उपग्रह सोडण्याच्याही तयारीत आहे. RISAT-2BR1, 2BR2, RISAT-1A, 1B, 2A यासह इस्रो आणखीही उपग्रह अवकाशात सोडणार आहे. २००९ आणि २०१२ या वर्षांमध्येही इस्रोने या श्रेणीतील उपग्रह सोडले होते. यावर्षी चार ते पाच मॉनिटरिंग उपग्रह सोडणार आहे.

RISAT-2B हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) सोडण्यात आला असून याद्वारे भारताच्या शेजारी देशांवरही लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे. तसेच कोणत्याही वातावरणात या उपग्रहाद्वारे विशिष्ट ठिकाणचे फोटो घेता येणार आहेत. तसेच या उपग्रहात अॅक्टिव्ह सेंसर्सदेखील लावण्यात आले आहेत. पुढील पाच वर्षांसाठी हा उपग्रह काम करू शकेल. तसेच ३०० किलो वजनाचा सिंथेटिक एपर्चर रडार दिवसा आणि रात्रीही अतिशय अचूक काम करू शकतो. इस्रायलने या सिंथेटिक एपर्चर रडारची निर्मिती केली आहे. तसेच बालाकोटसारख्या एअर स्ट्राईकमध्येही या उपग्रहांची मोठी मदत भारताला होणार आहे. याव्यतिरिक्त सीमेवर उभारण्यात आलेले बंकर आणि सैन्याच्या चौक्याही ओळखण्याचे आणि त्यांची संख्या मोजण्याचे काम या उपग्रहाच्या सहाय्याने करता येणार आहे. आपात्कालिन परिस्थितीतही या उपग्रहाची मदत होणार असून अशा प्रकारचे तंत्रज्ञान फार कमी देशांकडे आहे.

RISAT-2B च्या मदतीने पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेणे सोपे होणार आहे. मे ते सप्टेंबर या कालावधीत भारतात खरीपाची पिके घेतली जातात. या उपग्रहाच्या मदतीने आता त्या पिकांनाही मदत मिळणार आहे. याव्यतिरिक्त पूर आणि वादळ यांसारख्या आपात्कालिन परिस्थितीचीही माहिती घेता येणे शक्य होईल. जाणकारांच्या मते रडार इमेजिंग उपग्रहाला असेंबल करणे अतिशय कठिण काम असून त्याद्वारे मिळणाऱ्या फोटोंचे विश्लेषण करणे अधिक कठिण आहे. यापूर्वी RISAT-1 कडून मिळणाऱ्या माहितीचेही आकलन होण्यासाठी मोठा कालावधी लागला होता. रडार इमेजिंग उपग्रह अन्य उपग्रहांच्या तुलनेत अधिक हेवी डेटा पाठवत असतात. RISAT-2B हा उपग्रह अंतराळातून जमिनीवरील ३ फुट आकारापर्यंतच्या कोणत्याही वस्तूंचे फोटो घेण्यास सक्षम आहे.

या मोहिमेत भारतातील सेमी कंडक्टर लॅबने तयार केलेला विक्रम प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच हा कमी खर्चिक असून भविष्यातील सर्व मोहिमांमध्ये विक्रम प्रोसेसरचाच वापर करण्यात येणार असल्याचे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस. सोमनाथ यांनी सांगितले. तसेच यामध्ये लष्करासाठी आवश्यक बाबींचाही समावेश करण्यात आला असून जमिनीवरील छुप्या वस्तूंचीही ओळख या उपग्रहाच्या सहाय्याने पटवता येणार आहे. यापूर्वी २० एप्रिल २००९ रोजी RISAT सिरीजचा RISAT-2 हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता. त्यानंतर २६ एप्रिल २०१२ रोजी भारतीय बनावटीचा RISAT-1 हा रडार इमेजिंग उपग्रह अवकाशात सोडला होता.