स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळेच बलात्कार होतात असे बेताल वक्तव्य भाजपा खासदार नंदकुमार चौहान यांनी केले आहे. नंदकुमार चौहान हे मध्यप्रदेश भाजपाचे अध्यक्षही होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला. इंटरनेट आणि स्मार्टफोन या दोन्हीवर अश्लील चित्रफिती सहज उपलब्ध होतात. त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो आणि मग बलात्कारासारखे प्रकार वाढीला लागतात असे वक्तव्य चौहान यांनी केले. दमोह या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोनमुळे लोकांमध्ये विकृती वाढीला लागते, लोकांनी जागरूक राहायला हवे नाहीतर समाजाचे आरोग्य बिघडेल असेही नंदकुमार चौहान यांनी म्हटले आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटवर अश्लील साहित्यामुळे विकृती वाढते आहे तर मग मध्यप्रदेश सायबर सेल काय करतो आहे असा प्रश्नही चौहान यांना विचारला गेला. तेव्हा मध्य प्रदेशचा सायबर सेल एक मोबाइल फोनही दुरूस्त करू शकत नाही असे त्यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून देशात लहान मुलींवर बलात्कार झाले. गेल्या दोन आठवड्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या ६ घटना मध्यप्रदेशात झाल्या आहेत. मध्य प्रदेश सरकार महिला सुरक्षेच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरले आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे. बलात्कार, छेडछाडीच्या घटना वाढल्या तरीही पोलीस काहीही करताना दिसत नाहीत. कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत अशीही टीका काँग्रेसने केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नंदकुमार चौहान यांनी स्मार्ट फोन आणि इंटरनेटमुळे बलात्कार वाढतात हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.