बिहारमध्ये पूर्णपणे दारूबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यात दारुबंदी लागू करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची निवडणुकीदरम्यान राज्यात दारूबंदी लागू करण्याचे वचन दिले होते. १ एप्रिल रोजी देशी आणि मसालेदार दारूवर बंदी लावण्यात आली होती. त्यास मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळाल्याने नितीश कुमार सरकारने देशात तयार होणाऱ्या विदेशी दारूच्या शहरी भागातील विक्रीसदेखील प्रतिबंध लावला. नितीश कुमार सरकारच्या या निर्णयावरून समाजात प्रतिक्रिया उमटत असून, प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी दारूबंदीच्या निर्णयाविरुद्ध टि्वटरवर पोस्ट टाकत नितीश कुमारांवर निशाणा साधला. नितीश कुमारांच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करून दारूबंदीचा निर्णय आत्तपर्यंत यशस्वी न झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. नितीश कुमारांना उद्देशून केलेल्या टि्वटमध्ये ते म्हणतात, दारूसाठी १० वर्षे आणि अनधिकृतपणे हत्यार बाळगल्यास ५ वर्षाचा तुरुंगवास. टि्वटरवरील अन्य एका संदेशात ते म्हणतात, बिहारमध्ये अनधिकृत दारूचा धंदा वाढेल. जगभरात दारूबंदी अपयशी ठरली आहे. जागे व्हा! तुम्ही ३००० कोटी रुपयांच्या महसूलाचे नुकसान करत आहात.