प्रदुषणाने धोकादायक पातळी गाठल्याचे विपरीत परिणाम दिल्लीकरांच्या आरोग्याबरोबरच येथील पर्यटन व्यवसायावरही दिसू लागले आहेत. भारतात पर्यटनासाठी आलेले अनेक परदेशी पर्यटक प्रदुषणामुळे दिल्लीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. त्याऐवजी हे पर्यटक नजीकच्या थंड हवेच्या ठिकाणांवर जाण्यास पसंती देत आहेत. काही परदेशी पर्यटकांनी दिल्लीच्या प्रदुषणाचा अनुभवही घेतला आहे. मी गेल्या आठवड्यात दिल्लीत होते. मात्र, त्याठिकाणी धुक्याच्या पातळीत लक्षणीयरित्या वाढ झाली असून प्रदुषणामुळे घशाला कोरड पडत असल्याचे एका परदेशी महिलेने सांगितले. त्यामुळे बहुतांश पर्यटकांनी शिमला आणि धर्मशाळा ही थंड हवेची ठिकाणे गाठली आहेत. यामुळे एकीकडे दिल्लीच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होत असताना हिमाचल प्रदेशमधील हॉटेल मालकांचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात आमच्याकडे थेटपणे येणाऱ्या पर्यटकांचे वाढले असल्याची माहिती हिमाचल पर्यटन महामंडळाच्या बुकिंग अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

प्रदुषणाची गंभीरता दिल्लीपुरती मर्यादित नाही, हे दर्शविणारी छायाचित्रे
राष्ट्रीय हरित लवादाकडून या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित राज्यांच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या, असा सवाल लवादाकडून दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब आणि केंद्र सरकारला विचारण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीतील वाढत्या प्रदुषणाने शनिवारी आणि रविवारी सर्वोच्च सीमा पार केली आहे. दिल्लीमध्ये १० तास घालवणे म्हणजे ४० पेक्षा अधिक सिगारेट ओढण्या सारखी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील शाळांना ३ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच उत्पादनावर ५ दिवस बंदी घातली असून  दिल्लीमधील उत्पादन क्षेत्रातील उद्योगातून निर्माण होणारा घनकचरा नष्ट करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. पुढील दहा दिवस शहरामध्ये जनरेटरच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. रुग्णालय तसेच महत्त्वाच्या ठिकाणी या बंदीवर शिथला देण्यात आली आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. दिल्लीमध्ये पाला-पाचोळा जाळण्यावर देखील बंदी घालण्यात आली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले जात आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पाल-पाचोळा जाळण्यात येणाऱ्या परिसराची माहिती अधिकाऱ्यांना तात्काळ मिळणे शक्य होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या प्रदुषण पातळीत वाढ झाल्याने दिल्लीकरांचा श्वास गुदमरत आहे. पण प्रदूषणाच्या धोक्याची घंटा महाराष्ट्रातल्या काही शहरांवरही वाजत आहे. त्यामुळे आपण वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वेळीच पावले उचलली नाहीत, तर आज दिल्लीकर जे भोगत आहेत ती परिस्थिती महाराष्ट्रातील शहरांमध्येही उद्भवू शकते. मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर या शहराची हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे.