देशातील रुग्णवाढीचा चढता आलेख सलग दुसऱ्या दिवशीही कायमच होता. करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून सलग दुसऱ्या दिवशी २४ तासांत आणखी ३.३२ लाख जणांना करोनाची लागण झाली. हा एका दिवसातील उच्चांक असून त्यामुळे बाधितांची एकूण संख्या एक कोटी ६२ लाख ६३ हजार ६९५ वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने २४ लाखांचा टप्पा ओलांडला असून एका दिवसात आणखी २२६३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात गेल्या एका दिवसात आणखी तीन लाख ३२ हजार ७३० जणांना करोनाची लागण झाली, तर २२६३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एका लाख ८६ हजार ९२० वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असून सध्या देशात २४ लाख २८ हजार ६१६ उपचाराधीन रुग्ण आहेत. हे प्रमाण एकूण बाधितांच्या १४.९३ टक्के इतके आहे. तर करोनातून बरे होण्याचे प्रमाण ८३.९२ टक्के झाले आहे. आतापर्यंत एक कोटी ३६ लाख ४८ हजार १५९ जण करोनातून बरे झाले असून मृत्युदर आणखी घसरून १.१५ टक्के इतका झाला आहे.