News Flash

नवप्रवाही चित्रपटांचा दिग्दर्शक!

ऋतुपर्णो यांनी कारकिर्दीची सुरुवात जाहिरातपटांपासून केली. अगदी काही सेकंदात मानवी भावनांना स्पर्श करीत प्रेक्षकांवर गारूड करण्याच्या त्यांच्यातील कौशल्याला या जाहिरातपटांनीच झळाळी दिली आणि १९९४ साली

| May 31, 2013 06:35 am

ऋतुपर्णो यांनी कारकिर्दीची सुरुवात जाहिरातपटांपासून केली. अगदी काही सेकंदात मानवी भावनांना स्पर्श करीत प्रेक्षकांवर गारूड करण्याच्या त्यांच्यातील कौशल्याला या जाहिरातपटांनीच झळाळी दिली आणि १९९४ साली त्यांचा पहिला बंगाली चित्रपट झळकला तो ‘हिरेर अंगटी’ हा बालचित्रपट. या पहिल्याच चित्रपटाने त्यांचा चांगलाच बोलबाला झाला. पुढच्याच वर्षी, १९९५ मध्ये आलेल्या त्यांच्या ‘उन्नीशे एप्रिल’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार लाभला. आई आणि मुलीच्या भावबंधांना स्पर्श करणाऱ्या या चित्रपटात अपर्णा सेन यांची प्रमुख भूमिका होती. ‘दहन’ (१९९७) या चित्रपटात स्त्रीअत्याचाराविरोधात एका शिक्षिकेचा लढा होता. ‘बारीवाली’ या चित्रपटात लग्नाच्याच रात्री पती दगावल्यापासून एकाकी आयुष्य जगत असलेल्या श्रीमंत जमीनदार महिलेच्या मनाचा वेध होता. किरण खेर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका होती.  ‘अशुख’, ‘उत्सब’, पौंगडावस्थेतील मुलीत होणारे भावनिक संक्रमण उलगडणारा ‘तितली’ (प्रमुख भूमिका कोंकणा सेन शर्मा, अपर्णा सेन, मिथुन चक्रवर्ती), माणसाच्या मनात खोलवर असलेला संघर्ष आणि जगात वावरताना हेतू लपवून वावरण्याची त्याची धडपड मांडणारा ‘शुभमुहुर्तो’ (प्रमुख कलाकार- शर्मिला टागोर, राखी, नंदिता दास) आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कादंबरीवर आधारित ‘चोखेर बाली’ (कलाकार- ऐश्वर्या राय, रायमा सेन) हे त्यांचे बंगाली चित्रपट २००३ पर्यंत झळकले. २००४ मध्ये त्यांचा पहिला हिंदी चित्रपट झळकला तो ‘रेनकोट’. ऐश्वर्या राय, अजय देवगण आणि अन्नू कपूर यांच्या तरल भूमिका असलेला हा चित्रपट ओ हेन्रीच्या कथेवर आधारित होता. ‘ओंतोरमोहोल’ या २००५ साली आलेल्या चित्रपटात एका जमीनदाराच्या ‘अांतरमहाला’त त्याच्या दोन पत्नींमध्ये असलेला संघर्ष चितारला होता. रूपा गांगुली, सोहा अली खान, जॅकी श्रॉफ आणि अभिषेक बच्चन यांच्या त्यात मुख्य भूमिका होत्या. २००६ साली ‘दूसर’ हा कृष्णधवल चित्रपट त्यांनी केला. माणसाच्या मनातल्या काळ्यापांढऱ्या बाजू उलगडणाऱ्या या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरही गौरव झाला. २००७ साली त्यांनी ‘द लास्ट लीअर’ हा इंग्रजी चित्रपट केला. शेक्सपिअरच्या नाटकांमधून भूमिका केलेल्या आणि आता वृद्धावस्थेत उपेक्षेचे जिणे झेलत असलेल्या नटाची भूमिका यात अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. ‘खेला’पाठोपाठ २००८ मध्येच झळकला ‘सोब चरित्रो काल्पोनिक’ (सर्व पात्रे काल्पनिक) हा चित्रपट. यात एनआरआय व अत्यंत व्यवहारवादी तरुणीचा (बिपाशा बसू) शब्द आणि नादात रमलेल्या कविशी (प्रोशोन्नजीत) विवाह झाल्यावर दोन परस्परविरुद्ध विचारांच्या व्यक्तिंमध्ये होणारा संघर्ष चितारला होता. २०१० साली आलेल्या ‘अबोहोमन’ मध्ये बुजूर्ग चित्रपट दिग्दर्शक आणि नवोदित अभिनेत्रीतील प्रेमबंध होता. रवींद्रनाथ टागोर यांची ‘नौकाडूबी’ ही कादंबरी अनेक चित्रपट दिग्दर्शकांना भुरळ घालणारी होती. या कादंबरीवरून बंगालीत तीन चित्रपट झळकले तर हिंदीत ‘मिलन’ आणि ‘घूँघट’ हे चित्रपट आले होते. ऋतुपर्णो यांनी याच कादंबरीचा ढाचा तेवढा घेतला आणि पात्रांच्या भावनांचे पदर असे काही उलगडले की हा पूर्ण नवा आणि वेगळाच चित्रपट वाटला. २०१२ साली आलेल्या ‘चित्रांगदा’तून ऋतुपर्णो यांच्या सहज आणि सखोल अभिनयशैलीचेही प्रत्यंतर आले.
या चित्रपटात त्यांनी आपल्या लैंगिक ओळखीबाबत आंतरिक संघर्षांला तोंड देत असलेल्या नृत्यदिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. त्याआधी २००३ मध्ये ‘कथा देठिल्लि मा कु’ या उडिया चित्रपटात ते अभिनेता म्हणून लोकांसमोर आले होते.
‘सनग्लास’ हा आर. माधवन याने लिहिलेला आणि ऋतुपर्णो यांनी दिग्दर्शित केलेला २०१०२ चा चित्रपट अद्याप झळकलेला नाही. पूर्ण विनोदी धाटणीच्या या चित्रपटात आर. माधवन, कोंकोणा सेन शर्मा, रायमा सेन, जया बच्चन, नासिरुद्दिन शाह यांच्या भूमिका आहेत.
‘सत्यान्वेषी’ हा चित्रपट ऋतुपर्णो यांनी अलीकडेच हातावेगळा केला असून तो त्यांचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे. ब्योमकेश बक्षी या व्यक्तिरेखेवर आधारित त्यांच्या अन्य चित्रपटावर निर्मितीनंतरचे संस्कार बाकी असून ‘कहानी’चा दिग्दर्शक सुजोय घोष या चित्रपटाचा प्रमुख अभिनेता आहे.
श्रद्धांजली
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मनिष तिवारी : त्यांच्या अकाली मृत्यूने सर्वानाच धक्का बसला आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून त्यांच्यातील उत्तुंग सर्जनशीलतेचाच प्रत्यय आला आहे. मानवी भावनांचे त्यांनी रूपेरी पडद्यावर अधिकारसिद्ध प्रकटन केले.
अजय देवगण : समाजातील अस्पर्श बाजूंना त्यांच्या चित्रपटांनी स्पर्श केला होता. प्रत्येक गोष्टीकडे ते किती वेगळ्या पद्धतीने पाहू शकत याचा प्रत्यय ‘रेनकोट’च्या वेळी मला आला होता.
दिग्दर्शक ओनीर : त्यांच्या प्रत्येक चित्रचौकटीत सौंदर्य आणि सखोल अर्थ भरलेला असे. गेल्यावेळी आम्ही भेटलो तेव्हा त्यांच्या मनातल्या एका कथाकल्पनेवर मी चित्रपट दिग्दर्शित करावा, असे त्यांनी सुचविले. या चित्रपटासाठी नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांना घ्यायची त्यांची इच्छा होती.
ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी : त्यांच्या जाण्याने आम्ही जे गमावले आहे ते सहजी भरून येणारे नाही.
ममता बॅनर्जी : अतिशय धक्कादायक. बंगालने आपला अग्रणी दिग्दर्शक गमावला आहे.
रायमा सेन : चोखेर बाली मध्ये मला भूमिका देऊन त्यांनी माझ्या कारकिर्दीला कलाटणीच दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 6:35 am

Web Title: rituparno ghosh is new flow film director
Next Stories
1 अनिल अंबानी यांना न्यायालयाची नोटीस
2 जयराम रमेश यांची ममतांवर टीका
3 पंतप्रधानांच्या जपान दौऱ्यावर चिनी प्रसारमाध्यमांची आगपाखड
Just Now!
X