लॉकडाउनमुळे देशातील लोकांना बंदिस्त करून घ्यावं लागलं असलं, तरी याचा फायदा देशाच्या जीवनवाहिन्या असलेल्या नद्यांना होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. केंद्र सरकारनं यासाठी विशेष प्रयत्नही सुरू केले आहेत. पण, गंगा नदीच्या पाण्यात फारशी सुधारणा झाली नव्हती. लॉकडाउनमुळे हे होताना दिसत आहे. एका संशोधनातून गंगेच्या पाण्याची गुणवत्ता ४० ते ५० टक्क्यानं वाढली असल्याचं समोर आलं आहे.

करोनामुळे केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची विक्री वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये शुकशुकाट असून याचा परिणाम जलशुद्धीकरण मोहिमेला बळ देणारा ठरला आहे. गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. केंद्र सरकारनं वेगळं मंत्रालय यासाठी सुरू केलं पण, फारसा परिणाम दिसून आला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे लॉकडाउनच्या मागील दहा दिवसातच गंगेच्या पाण्याची गुणवत्ता ४० ते ५० टक्क्यांनी वाढली आहे. कानपूरमध्ये गंगेच्या पाण्याची चाचणी करण्यात आली. त्यानंतर हा फरक दिसून आला.

गंगेच्या पात्रात जाणार एक दशांश दूषित पाणी आजूबाजूच्या कंपन्या आणि कारखान्यातील आहे. मात्र, लॉकडाउन लागू झाल्यानंतर कंपन्या आणि कारखाने बंद आहे. दहा दिवसांपासून हे उद्योग बंद असल्यानं गंगेच्या पाण्याची गुणवत्ता सुधारताना दिसत आहे. तब्बल ४० ते ५० टक्के पाणी शुद्ध झाले आहे. ही चांगली सुधारणा आहे,’ असं डॉ. मिश्रा यांनी सांगितल.