सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वो लालूप्रसाद यादव यांना १४ वर्षांची शिक्षा आणि ६० लाख रूपयांचा दंड ठोठवला. न्यायमूर्ती शिवपाल सिंह जेव्हा निकालावर निर्णय देत होते, त्यावेळी लालूंवर रांचीतील रिम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. शिक्षेची माहिती मिळताच लालूंचा रक्तदाब वाढला. माध्यमांच्या हाती आलेल्या वृत्तानुसार लालूंचा रक्तदाब १२४/८५ वरून १४०/९० झाला होता. त्यांच्या घशाला कोरड पडली होती, चेहरा घामेघूम झाला होता. निकालाचा तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. याचवेळी त्यांनी २० ते २५ मिनिटांदरम्यान सुमारे १० ग्लास पाणी प्यायले. न्यायालयाने ११ वाजून १९ मिनिटांनी निकाल दिला. त्यावेळी लालूप्रसाद हे विश्रांती घेत होते. आमदार भोला यादव यांनी शिक्षेची माहिती लालूंना दिली. इतकी मोठी शिक्षा ऐकून लालूंना सुरूवातीला यावर विश्वास बसला नव्हता.

जेव्हा लालूंना घाम येऊ लागला त्यावेळी परिचारिकेने त्यांचा रक्तदाब तपासला. त्यांना त्वरीत औषधं देण्यात आली. सकाळपासूनच ते निकालावरून तणावात होते. त्यांनी सकाळी नाश्ताही केला नव्हता. दुपारी त्यांनी कमी जेवण केल आणि सांयकाळी चहाही घेतला नाही. चारा घोटाळ्यातील दुसऱ्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या लालूंची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर रिम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचा मधुमेहाचा त्रास वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना इन्सुलिन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण लालू ते घेण्यास नकार देत आहेत. लालूंच्या मते शरिरातील इन्सुलिन आपोआप कमी होईल.

दरम्यान, चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ७-७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांना ६० लाख रूपयांचा दंड ही ठोठावण्यात आला आहे. परंतु, त्यांच्या शिक्षेबाबत अजून संभ्रम आहे. कारण ही शिक्षा एकाचवेळी भोगायची की वेगवेगळी हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. निकालाची प्रत मिळाल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल, असे वकिलांनी म्हटले आहे. दमुका कोषागारमधून ३.१३ कोटी रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी लालूंना विशेष न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले होते.