राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जोरदार दणका दिला आहे. लालूप्रसाद यांची मुलगी मिसा भारती आणि जावई शैलेश कुमार यांचा दिल्लीतील फार्म हाऊस ईडीने जप्त केला आहे.

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मिसा आणि त्यांचे पती शैलेश कुमार ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने कारवाई करून मिसा भारती यांचा दिल्लीतील पालम येथील बिजवासन येथील फार्म हाऊस जप्त केला आहे. ईडीच्या या कारवाईने लालूप्रसाद यांचे धाबे दणाणले आहेत, असे मानले जाते. या पूर्वी ईडीने ८ हजार कोटींची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी मिसा यांच्या निवासस्थानी छापा मारला होता. तसेच मिसा आणि तिच्या पतीच्या नावे असलेल्या तीन फार्म हाऊसची झडती घेण्यात आली होती. त्यांचे पती शैलेश कुमार मिशेल प्रिंटर्स अँड पॅकर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक होते.

तसेच मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन या दोन जैन बंधूंची मार्चमध्ये धरपकडही केली होती. त्यानंतर मे मध्ये सीए राजेश अगरवाल यालाही अटक करण्यात आली होती. जैन बंधूंनी २००७-२००८ या कालावधीत मिशेल प्रायव्हेट लिमिटेडचे १०० रूपये प्रतिदराने १ लाख २० हजारांचे शेअर खरेदी केले होते. शालिनी होल्डिंग्ज लिमिटेड, अॅड फिन कॅपिटल सर्व्हिसेस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, मणि माला दिल्ली प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड आणि डायमंड विनिमय प्रायव्हेट लिमिटेड या चार बोगस कंपन्यासाठी त्यांनी हे शेअर खरेदी केले होते. त्यानंतर मिसाने १ लाख २० हजाराचे हे शेअर १० रूपये प्रति दराने पुन्हा खरेदी केले होते. मिसा आणि त्यांच्या पतीच्या कंपन्यांतील व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आल्याने ईडीने ही कारवाई केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.