राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. रांचीतील रिम्स रुग्णालयात लालूप्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरू असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यादव यांना उपचारासाठी चांगल्या रुग्णालयात न्यावे, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाच्या आमदार रेखा देवी यांनी केली आहे.

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून खालावल्याचे वृत्त आहे. लालूप्रसाद यादव यांना विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यांचा रक्तदाब वाढला असून गेल्या दोन दिवसांपासून गुडघेदुखीही वाढली आहे. यामुळे लालूप्रसाद यादव यांचे फिरणेही बंद झाले आहे. याशिवाय त्यांना मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने ग्रासले आहे. यानंतर लालूप्रसाद यादव यांचे कुटुंबीय आणि पक्षातील नेते रांचीतील रुग्णालयात पोहोचले आहेत.

राष्ट्रीय जनता दलाच्या आमदार रेखा देवी यांनी शनिवारी सकाळी रिम्स रुग्णालयात जाऊन लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयाबाहेर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना चालता येत नाही. रक्तदाबही वाढला आहे. त्यांच्यावर चांगल्या रुग्णालयात उपचार करण्याची गरज आहे. लालूप्रसाद यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.